पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, भारतातील सर्वात लांब सागरी पुलाचं करणार उद्घाटन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. ते 30,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईत देशातील सर्वात लांब सागरी सेतू अटल सेतूचे उद्घाटन होणार आहे.

  मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi w) आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात 30,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. सकाळी 10.45 वाजता ते नाशिकला पोहोचतील त्यानंतर त्यांचा रोड शो होणार आहेत. नाशिकच्या तपोवन मैदानावर 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदी मुंबईत येणार असून  भारतातील सर्वात लांब सागरी पूलाचं (India’s longest sea bridge in Maharashtra) त्यांच्या हस्ते  उद्घाटन होणार आहे.

  महाराष्ट्रात विविध प्रकल्पांचं उद्घाटन

  ते अटलबिहारी वाजपेयी शिवरी-न्हावा शेवा अटल पुलाचे उद्घाटन करून त्यावर प्रवास करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान नवी मुंबईत रोड शो करणार आहेत. पंतप्रधान नवी मुंबईतील विमानतळ मैदानावर अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.

  भारतातील सर्वात लांब सागरी सेतूचं उद्घाटन

  अटल सेतू 17,840 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधण्यात आला आहे. हा सुमारे 21.8 किमी लांबीचा 6-लेन पूल आहे. हा भारतातील सर्वात लांब सागरी पूल आहे. त्याची लांबी समुद्रावर सुमारे 16.5 किमी आणि जमिनीवर सुमारे 5.5 किमी आहे. डिसेंबर 2016 मध्ये पीएम मोदींनी पुलाची पायाभरणी केली होती.

  भूमिगत रस्ते बोगद्याचं भूमिपूजन

  ईस्टर्न फ्रीवेच्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्हला जोडणाऱ्या भूमिगत रस्त्याच्या बोगद्यासाठी मोदी पायाभरणी करतील. 9.2 किमी लांबीचा हा बोगदा 8,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधण्यात येणार आहे. मुंबईतील हा एक महत्त्वाचा पायाभूत विकास असेल ज्यामुळे ऑरेंज गेट आणि मरीन ड्राइव्ह दरम्यानचा प्रवास वेळ कमी होईल.

  पंतप्रधान सूर्य प्रादेशिक बल्क पेयजल प्रकल्पाचा पहिला टप्पा राष्ट्राला समर्पित करतील. 1975 कोटींहून अधिक खर्च करून विकसित केलेला हा प्रकल्प महाराष्ट्रातील पालघर आणि ठाणे जिल्ह्यांना पिण्याचे पाणी पुरवेल. याचा फायदा सुमारे 14 लाख लोकसंख्येला होणार आहे.

  मोदी सुमारे 2,000 कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प देशाला समर्पित करणार आहेत. यामध्ये ‘उरण-खारकोपर रेल्वे मार्गाच्या फेज 2’ च्या लोकार्पणचा समावेश आहे. त्यामुळे नवी मुंबईशी संपर्क वाढणार आहे. उरण रेल्वे स्थानक ते खारकोपरपर्यंत धावणाऱ्या ईएमयू ट्रेनला पंतप्रधान हिरवी झेंडी दाखवतील.