कराड विमानतळाच्या विस्तारीकरणाची कामे वर्षभरात पूर्ण करण्यास प्राधान्य : शंभुराज देसाई

एका वर्षात कराड विमानतळाचे विस्तारीकरण आणि रात्रीच्या वेळी विमान सेवा सुरू करणे. याबाबीला प्राधान्य देण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील पर्यटन, उद्योग वाढीला चालना मिळणार आहे, असे कराड विमानतळाच्या विस्तारीकरणाबाबतच्या आढावा बैठकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

    सातारा : एका वर्षात कराड विमानतळाचे विस्तारीकरण आणि रात्रीच्या वेळी विमान सेवा सुरू करणे. याबाबीला प्राधान्य देण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील पर्यटन, उद्योग वाढीला चालना मिळणार आहे, असे कराड विमानतळाच्या विस्तारीकरणाबाबतच्या आढावा बैठकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

    या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधिक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपवनसरंक्षक आदिती भारद्वाज, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, विमानतळ प्राधिकरणाचे विभागीय व्यवस्थापक संतोष नलावडे, उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता जयंत शिंदे आदी उपस्थित होते.

    कराड विमानतळ विस्तारीकरण व नाईट लॅडींग हा विषय अनेक वर्षापासूनचा प्रलंबित आहे. 2012-13 मध्ये विस्तारीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सध्याची असणारी 1 हजार 280 मीटरची धावपट्टी वाढवून ती 1 हजार 700 मीटर करण्यात येणार आहे. विस्तारीकरणासाठी 48 हेक्टरचे भूसंपादन झाले आहे. जवळपास 62 टक्के खातेदारांना भूसंपादन पोटी मिळणारा निधी शासनाने वितरीत केला आहे. उर्वरित खातेदारांना पंधरा दिवसांची नोटीस देऊन भूसंपादनाची भरपाई स्विकारण्याचे आवाहनही पालकमंत्री देसाई यांनी केले.