पाटस घाटात खाजगी बसचा अपघात; बसच्या पुढील भागाचा चक्काचूर; दोघे जागीच ठार, 30 प्रवासी गंभीर

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Solapur Highway) पाटस घाटाच्या पायथ्याशी सोलापूरहून पुण्याकडे निघालेल्या खाजगी बसचा भीषण अपघात (Accident in Patas) झाला. या अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला. तर लहान मुलांसह ३० प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

    पाटस : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Solapur Highway) पाटस घाटाच्या पायथ्याशी सोलापूरहून पुण्याकडे निघालेल्या खाजगी बसचा भीषण अपघात (Accident in Patas) झाला. या अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला. तर लहान मुलांसह ३० प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

    डॉ. श्वेता प्रभु पंचाक्षरी (वय ३३) व सत्यभामा शेषराव बायने (वय ७२) (दोघेही रा. अवला ता. निलंगा, जि. लातूर) तसेच बाळू शिरखाने (संपूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) हा गंभीर जखमी झाला असून, त्यास पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर लहान मुलांसह ३० प्रवासी जखमी झाले आहेत. ही माहिती पाटस पोलीस चौकीचे उपपोलीस निरीक्षक संजय नागरगोजे यांनी दिली.

    याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी (दि. २६) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास सोलापूरवरून खाजगी बस ३० ते ४० प्रवाशांना घेऊन पुणेकडे भरधाव वेगाने जात होती. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस घाटाच्या पायथ्याशी महामार्गावर रस्त्याच्या कडेला टायर फुटल्याने उभा असलेल्या सिमेंट वाहतूक करणाऱ्या मालवाहतूक ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन महिला प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर लहान मुलांसह ३० प्रवासी हे गंभीर व किरकोळ मार लागल्याने जखमी झाले आहेत.

    या जखमींना पोलिसांनी पाटस व परिसरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे. या अपघातात लक्झरी बसचा पुढील भाग चक्काचूर झाला आहे. तर सिमेंट मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधील सिमेंट मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहनचालकांवर गुन्हा दाखल केला आहे.

    दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पाटस पोलीस चौकीचे उपपोलीस निरीक्षक संजय नागरगोजे, पोलीस हवालदार भानुदास बंडगर, महामार्ग वाहतूक पोलीस उपनिरीक्षक महेश कोंडूभैरी, श्रीहरी पानसरे, रोहीदास जाधव, रविंद्र ठाकूर तसेच पाटस टोल नाका प्लाझा कंपनीचे व राष्ट्रीय महामार्गाचे वाहतूक सुरक्षा पथकाने धाव घेतली. यावेळी पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्यावर बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. याबाबत पुढील अधिक तपास पाटस पोलीस करीत आहेत.