कमिन्स अभियांत्रिकीला हॅकेथॉनमध्ये पारितोषिक

  पुणे : केंद्र सरकारतर्फे आयोजित स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धा भरवली जाते. या स्पर्धेत देशभरातील कोलेजेस सहभागी होतात. यंदा देखील ही स्पर्धा संपन्न झाली. यात पुण्यातील ‘कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर विमेन’च्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. कमिन्स महाविद्यालयाच्या ‘टॉरेंट-झी’ या गटाला ‘प्रॉब्लेम स्टेटमेंट’ करिता उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल एक लाख रुपयांचा धनादेश आणि सर्वोच्च पारितोषिक मिळाले आहे.

  या गटात सानिया दिघे, ईशा शिंदे, स्निग्धा श्रीवास्तव, आदिती वाघ, मृणाल विभूते, ईशा सातवळेकर यांचा सहभाग होता. दिल्ली येथे हा कार्यक्रम झाल्यावर विद्यार्थिनीनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्ली येथील आपल्या निवासस्थानी या विद्यार्थिनींशी आपुलकीने संवाद साधला. त्यांच्याकडून संपूर्ण स्पर्धेची प्रक्रिया तसेच विद्यार्थिनीनी सादर केला प्रकल्प जाणून घेतला. तसेच भविष्यातील विद्यार्थीनींच्या अपेक्षा जाणून घेता त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी खा. सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. त्यांनी देखील विद्यार्थिनींचे कौतुक केले.
  या स्पर्धेत यंदा प्रथमच ऑनलाइन प्रात्यक्षिकांच्या सादरीकरणातुन संपूर्ण देशातील अनेक संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यातून अंतिम फेरीसाठी पाच संघांची निवड करण्यात आली होती.त्यात कमिन्स महाविद्यालयाचा टॉरेंट-झी’ गट यशस्वी ठरला.

   

  हॅकेथॉन म्हणजे काय ?

  देशासमोरच्या आव्हानांवर अनेक तोडगे काढण्यासाठी विद्यार्थी काम करतात. समस्यांवर उपाय पुरवण्याबरोबरच डाटा, डीजीटायझेशन आणि हाय टेक भविष्य यातून तयार होणार आहे. नवोन्मेश, संशोधन, विकास आणि उद्योजकता यासाठी आवश्यक परीरचना देशात उभारण्यात येत आहे. त्यासाठी भारताचे शिक्षण अधिक आधुनिक करणे आणि नैपुण्याला अधिक संधी निर्माण करणे हे उद्दिष्ट असून त्यासाठी ही स्पर्धा भरवली जाते.

  हॅकेथॉन हे जगातील सर्वात मोठे खुले संशोधन मॉडेल आहे ज्यात 4.5 लाखाहून अधिक विद्यार्थी, 2000 हून अधिक शैक्षणिक संस्था, 1000 पेक्षा अधिक मार्गदर्शक, 1500 हून अधिक मूल्यांकन करणारे, 70 हून अधिक समस्या सादर करणार्‍या एजन्सी आहेत .