gtb nagar redevelopment meeting

मुंबईतील जीटीबी नगर विभागाच्या पुनर्विकासाचा (GTB Nagar Redevelopment) प्रश्न लवकर मार्गी लागणार आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या अध्यक्षतेखाली आज या विषयावर बैठक (Meeting) घेण्यात आली.

    मुंबई: अनेक वर्षांपासून रखडलेला मुंबईतील जीटीबी नगर विभागाच्या पुनर्विकासाचा (GTB Nagar Redevelopment) प्रश्न आता लवकर मार्गी लागणार आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या अध्यक्षतेखाली आज या विषयावर बैठक (Meeting) घेण्यात आली. या बैठकीला बाळासाहेब थोरात यांच्यासोबत मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळातून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap), मुंबई महानगरपालिका (BMC) विरोधी पक्षनेते रवी राजा (Ravi Raja), मुंबई काँग्रेसचे कोषाध्यक्ष भूषण पाटील, सहकोषाध्यक्ष अतुल बर्वे उपस्थित होते. तसेच या बैठकीला प्रशासनातर्फे महसूल विभागाचे सचिव, प्रकल्प पुनर्वसन विभागाचे सचिव, तसेच या विषयासंबंधित जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी, एफ नॉर्थ वॉर्ड मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, मुद्रांक शुल्क विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच जीटीबी नगर रहिवाश्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

    याबाबत अधिक माहिती देताना भाई जगताप म्हणाले की, जीटीबी नगर येथील पंजाबी कॉलनी या विभागातील सर्व सोसायट्यांवरील स्टॅम्प ड्युटीवर ४००% दंड ठोठावण्यात आला होता. हा दंड माफ करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. तसेच या विभागातील २०१ रहिवासी कुटुंबांना सनद देण्यासंदर्भात २०% इतका मोठा दंड लावण्यात आला होता. तो दंड ३% पर्यंत कमी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. हा ३% दंड भरल्यानंतर या २०१ रहिवासी कुटुंबांना सनद देण्यात येईल. तसेच जीटीबी नगरच्या या पंजाबी कॉलनी परिसरातील २५ सोसायट्यांचे सीमांकन करण्यात आले आहे. पण त्या सीमांकनामध्ये सोसायट्यांचे क्षेत्रफळ नमूद केलेले नाही. या सर्व २५ सोसायट्यांचे क्षेत्रफळ काढून त्यांच्या सीमांकनामध्ये नमूद करण्यात यावे व त्या त्या सोसायट्यांना सुपूर्द करण्यात यावे असे निर्देश या बैठकीत देण्यात आले.