सुब्रतो रॉयविरोधातील कारवाई सुरूच राहणार; कारवाई रद्द करण्याचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

नुकतच निधन झालेले सहारा इंडिया रिअल इस्टेट, सहारा हाउसिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्याविरोधात सेबीने सुरू केलेली फौजदारी कारवाई रद्द करण्याची मागणी करणारा अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळून लावला.

    मुंबई : नुकतच निधन झालेले सहारा इंडिया रिअल इस्टेट, सहारा हाउसिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्याविरोधात सेबीने सुरू केलेली फौजदारी कारवाई रद्द करण्याची मागणी करणारा अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळून लावला. यासोबतच फसवणुकीच्या गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या विभागाकडून (एसएफआयओ) या प्रकरणी अहवाल सादर होईपर्यंत तरी सेबीच्या कारवाईला स्थगिती देण्याची रॉय आणि त्यांच्या दोन्ही कंपन्यांची मागणीही विशेष न्यायालयाने फेटाळली.

    एसएफआयओकडून केल्या जाणाऱ्या तपासाची माहिती न्यायालयाला देण्यात सेबी अयशस्वी ठरली असून, त्यांच्याविरोधातील दोन समांतर तपास करणे अशक्य असल्याचा दावा रॉय आणि कंपन्यांच्या वतीने करण्यात आला होता. त्यामुळे हे प्रकरण पुढे नेण्यास विरोध करण्याचा अर्ज करण्यात आला होता.

    कारवाईला स्थगिती देण्याची गरज नाही

    एसएफआयओचा तपास सेबीला बंधनकारक नसल्याचे सेबीने प्रत्यूत्तरा दाखल सांगून अर्जाला विरोध करण्यात आला. सरकारी संस्था त्यांच्याकडील माहिती एकमेकांना देत असतील, तर त्याला अधिकारक्षेत्रावरील अतिक्रमण म्हणता येणार नाही. उल्लंघनाच्या आरोपाप्रकरणी सेवीकडून दोन्ही कंपन्यांविरोधात सध्या कोणताही कारवाई केली जात नाही.

    सेबीच्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या प्रकरणातच दोन्ही कंपन्या आणि रॉय यांच्यावर कारवाई केली जात आहे. कारवाईला स्थगिती देण्याची आवश्यकता नसल्याचा दावाही सेबीने केला. त्याची दखल घेऊन विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. ए. कुलकर्णी यांनी सेवी ही केंद्रीय किंवा राज्य तपास संस्था नसल्याचे म्हटले. दुसरीकडे, सेबीचा तपास पूर्ण झाला असून संबंधित मंडळाने काढलेला निष्कर्ष आणि शिफारसींच्या आधारे खटला दाखल करण्यात आला आहे.