वारकरी संप्रदायात व्यावसायिकता?; कीर्तनकार, पखवाज वादक, गायकांच्या बिदागीत वाढ

चंदगड तालुक्यातील अनेक गावांमध्ये वारकरी सांप्रदाय वाढत चालला असला तरी अलीकडच्या काळामध्ये प्रवचन- कीर्तनकार आणि पखवाज वादक, गायक, साथीदार यांच्या हजारो रुपयांच्या पाकिटाच्या मागणीमुळे दिवसेंदिवस व्यावसायिक स्वरूप दिसून येत आहे.

चंदगड : चंदगड तालुक्यातील अनेक गावांमध्ये वारकरी सांप्रदाय वाढत चालला असला तरी अलीकडच्या काळामध्ये प्रवचन- कीर्तनकार आणि पखवाज वादक, गायक, साथीदार यांच्या हजारो रुपयांच्या पाकिटाच्या मागणीमुळे दिवसेंदिवस व्यावसायिक स्वरूप दिसून येत आहे. त्यामुळे गावातील मंदिर जिर्णोद्धार तसेच हरिनाम सप्ताहाच्या संयोजक मंडळींना मात्र हे कार्यक्रम पार पाडताना मोठी आर्थिक झळ बसत आहे. प्रसादासाठी किंवा इतर साहित्यापेक्षा प्रवचन – किर्तनकारांची, पखवाज वादक, गायकांच्या बिदागीचीच रक्कम प्रमाणापेक्षा जास्त होत आहे. त्यामुळे असे कार्यक्रम करताना ग्रामस्थांना खर्चिक आणि न परवडणारे वाटत आहेत.

दलाल प्रवृत्ती बळावतेय

गावागावातील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार मोठ्या थाटात संपन्न होत आहेत. एक वेळ शाळेची डागडूजी करण्यासाठी किंवा पाण्याची होणारी गैरसोय याबाबत ग्रामस्थ देणगीसाठी पुढे येत नाहीत. मात्र मंदिराच्या बांधकामासाठी लाखो रुपयांची देणगी देऊन आपले नाव जिर्णोद्धार कमिटीच्या देणगी यादीत पहिल्याच क्रमांकावर कोरलेले दिसले पाहिजे, या हेतूने देणगीदार ग्रामस्थांचा ओघ वाढत चालला आहे. एकीकडे देणगीदारांची संख्या वाढत चालली आहे. तर दुसरीकडे मात्र सांप्रदायिक मंडळातील दलाली प्रवृत्ती बळावत चालली आहे.

सांप्रदयातील व्यावसायिकता थांबणार कधी ?

चंदगड तालुक्यातील अडकूर पंचक्रोशीतील आमरोळी येथील एका पखवाज -तबला वादक गुरुजी मंडळींनी तालुक्यातील आपल्या शिष्य गण आणि सांप्रदायातील भजनी मंडळाच्या कलाकरांना आपल्या घरी एकत्रितपणे बोलावून बैठक घेतली आणि आपल्या पाकिट वाढीसाठी जोरदार चर्चा केली. तेंव्हा अशा दलालांना जाब विचारणार तरी कोण…? आणि सांप्रदयातील व्यावसायिक स्वरूप थांबणार तरी कधी…..,? असा प्रश्न सुज्ञ भक्तजनाना भेडसावत आहे.

महिला किर्तनकारांच्या किर्तनासाठी मोठी गर्दी

तालुक्यातील निट्टूर, कोवाड, बागिलगे, मांडेदुर्ग, म्हाळेवाडी, घुल्लेवाडी, माणगाव, दुंडगे, किणी, राजगोळी, मलतवाडी, मोरेवाडी, विंझणे, आदी गावातील महिला हरीपाठ मंडळी भक्तीमय वातावरणात हरिपाठ कार्यक्रम करताना दिसत आहेत. तालुक्यातील कुठल्याही गावात महिला किर्तनकार असेल तर त्याठिकाणी लोकांची मोठी गर्दी होते. त्यामहिला किर्तनकार मंडळीच्या किर्तनाची सगळीकडे चर्चा केली जाते. मात्र त्याचं अनुकरण करणे, आणि त्यांच्या मधुर वाणीचे कौतूक करण्यासाठी म्हणावा तसा प्रतिसाद दिसून येत नाही. हे दुर्दैव म्हणावे लागेल.

विणेकरी सुध्दा भाडोत्री ?

पारायण सोहळ्यासाठी गावातील तसेच भागातील दानशूर व्यक्ती सढळ हाताने हजारो रुपयांची, तसेच वस्तू रुपाने, अन्नदान (पंगती) अशा अनेक मार्गांनी देणगी देऊन मदत करतात. मात्र पारायण मंडळाच्या संयोजक मंडळींकडून योग्य असे नियोजन होत नसल्याचे स्पष्ट दिसून येते. तालुक्यातील मोठ्या बाजारपेठेचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि पंचक्रोशी पारायण सोहळा म्हणून परिचित असलेल्या या पारायण सोहळ्यासाठी किर्तन, प्रवचनकार मंडळीस विणेकरी सुध्दा मजूरी देवून भाडोत्री उभे केले जात असल्याने याला भक्ती म्हणायचे काय…..? कि केवळ दिखाऊपणा.

नागरदळेत हरिनाम सप्ताहात गटबाजी

चंदगड तालुक्यातील सांप्रदायाची मुहूर्त मेढ म्हणजेच सुरुवात झाली ते कोवाड – किणी कर्यात भागातील नागरदळे हे गाव. या गावातील सांप्रदायाची परिपूर्ण माहिती असलेले कै. ह.भ.प.मारुती मामा देवण हे तालुक्यातील एकमेव किर्तनकार. त्यांनी तालुक्यातील अनेक गावांमध्ये संगित भजनी मंडळे स्थापन केली. त्यांना शिकविले. त्यांना भक्ती मार्गाला लावले. मात्र त्यांच्याच नागरदळे गावात एकाच वेळी दोन हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. एकमेकांच्या ईर्षेने लावले जाणारे ध्वनिप्रदूषण भक्ती मार्गाला अडसर ठरत आहेत. गावात गटातटाचे राजकारण असू दे. परंतु, देवाधर्माच्या ठिकाणी असे दोन सप्ताह करणे चुकीचे असल्याचे भाविक भक्त भजनी मंडळाच्यांतून बोलले जात आहे. या सर्वांचाच विचार तालुक्यातील माळकरी, वारकरी, किर्तन- प्रवचनकार, पखावज, तबलावादक,गायक साथीदार आदी मंडळींनी करून आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे एवढे मात्र नक्की.