अहमदनगर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू, 5 पेक्षा जास्त जणांना एकत्र येण्यास बंदी; नेमकं कारण काय?

अहमदनगर जिल्ह्यामध्ये 2 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी हे आदेश लागू केले आहेत.

    अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यामध्ये 2 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी हे आदेश लागू केले आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) आणि 37(3) अन्वये 20 जानेवारी 2024 ते 2 फेब्रुवारी 2024 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. या काळात सार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी सभा घेण्यास, मिरवणुका काढण्यास आणि 5 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.

    मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा उद्या 21 जानेवारीला अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशामुळे एकच खळबळ उडाली आहे. या आदेशानुसार नमूद केलेल्या कालावधीत व ठिकाणी कोणत्याही व्यक्तीला पुढीलप्रमाणे कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे.

    शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू बरोबर ठेवण्यास बंदी आहे. यासोबतच दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. जाहीरपणे घोषणा देणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे, ध्वनीवर्धक किंवा ध्वनीक्षेपक यासारखे मानवी आवाजाचे वर्धन करणारा किंवा तो जसाच्या तसा ऐकवणारे उपकरण संच वापरणे किंवा वाजवणे, सभ्यता अगर नीतिमत्ता यास धक्का पोचेल किंवा शांतता धोक्यात येईल, असे कोणतेही कृत्य करण्यास बंदी घालण्यात आली आहे.