protest against toll

मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) हातिवले येथील टोलसेवा अचानक सुरु करण्यात आली. याआधी देखील ती सुरु करण्याचा घाट घालण्यात आला होता. मात्र प्रखर विरोधामुळे तो सफल झाला नव्हता.

  राजापूर: एकीकडे मुंबई-गोवा महामार्गाचे (Mumbai – Goa Highway) काम अपूर्ण असतानाच दुसरीकडे हातिवले येथील टोल सेवा (Hatiwale Toll Service) सुरु करण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या वाहन चालकांनी व सर्व पक्षियांनी टोलनाक्यावर जात चांगलाच (Protest Againg Toll) हंगामा केला. जोपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल वसुली सुरु होता कामा नये, यासह विविध मागण्या रेटुन धरल्या. त्यामुळे चांगलाच तणाव निर्माण झाला. अखेर उद्यापर्यंत टोलवसुली स्थगित ठेवण्यात आली आहे. दरम्यान भाजप नेते माजी खासदार निलेश राणे गुरुवारी राजापूरात येत असुन त्यावेळी टोलबाबत कोणती भूमिका घेतात त्याकडे लक्ष लागले आहे.

  मुंबई-गोवा महामार्गावर हातिवले येथील टोलसेवा अचानक सुरु करण्यात आली. याआधी देखील ती सुरु करण्याचा घाट घालण्यात आला होता. मात्र प्रखर विरोधामुळे तो सफल झाला नव्हता. त्यावेळी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सर्वपक्षीयांसह वाहनचालकांनी मुंबई-गोवा महामार्गावरील तालुक्यातील हातिवले येथे टोलवसुली करण्यास विरोध केला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून टोलवसुली सुरू झालेली नव्हती. मात्र, ठेकेदाराकडून आजपासून टोलवसुली सुरूवात करण्यात आली. त्यामुळे सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांसह वाहनचालकांनी पुन्हा एकदा टोलवसुली विरोधात आक्रमक पवित्रा घेत विविध मागण्यांची जोपर्यंत पूर्तता होत नाही तोपर्यंत टोलवसुली करण्यास विरोध केला.

  यावेळी वाहने थांबवून भर रस्त्यामध्ये काहींनी ठिय्या मांडत टोलवसुली विरोधात आंदोलन छेडले. दरम्यान, भाजपचे प्रदेश सचिव आणि माजी खासदार निलेश राणे यांनी भ्रमणध्वनीद्वारे टोलवसुली करणार्‍या ठेकेदारासह लोकांशी संवाद साधला.

  यावेळी त्यांनी टोलवसुलीला आक्रमकपणे विरोध करताना २२ डिसेंबरपर्यंत टोलवसुली न करण्याची सूचना केली. त्याप्रमाणे टोलवसुली तात्काळ थांबविण्यात आली असून उद्या (ता. राजापूर ) सकाळी १० वा. माजी खासदार राणे हे राजापूरवासियांसमवेत ठेकेदारांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर टोलवसुली संबंधित पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

  मुंबई-गोवा महामार्गावरील तालुक्यातील हातिवले येथे टोल प्लाझा उभारण्यात आला आहे. या ठिकाणी टोलवसुलीसाठी ठेकेदार नियुक्त करून त्याला टोलवसुली करण्याचे निर्देशही प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत. मात्र, महामार्गाचे अपुरे असलेले काम, अनेक शेतकर्‍यांचे रखडलेले मोबदले आदी विविध कारणांसह टोलनाक्यावरील कर्मचारी नियुक्तीमध्ये स्थानिकांना प्राधान्य, तालुक्यातील वाहनांना मोफत टोलवसुली आदी विविध मागण्या करीत सर्वपक्षीयांसह वाहनचालक आणि राजापूरवासियांकडून या टोलवसुली विरोध करण्यात आला. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून टोलवसुली बंद ठेवण्यात आली होती. मात्र आजपासून टोलवसुलीला सुरूवात झाली. याबाबतची माहिती मिळताच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष अशफाक हाजू, शहराध्यक्ष सौरभ खडपे, भाजपच्या युवा मोर्चाचे अरविंद लांजेकर, भाजपचे उपजिल्हाध्यक्ष रविंद्र नागरेकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुभाष बाकाळकर, शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र सरवणकर, प्रसाद मोहरकर, पंढरीनाथ आंबेरकर आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्ते, वाहनचालकांनी टोलवसुलीच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत त्याला विरोध केला.

  यावेळी हाजू, लांजेकर, खडपे, कोरगावकर, मनोज सप्रे आदींनी भर रस्त्यामध्ये ठिय्या मांडत टोलवसुली विरोधात घोषणाबाजीही केली. त्यानंतर, उपस्थितांनी ठेकेदाराशी संवाद साधत टोलवसुली करू नये, अशी सूचना केली. त्यानंतर चर्चा सुरू असताना माजी खासदार राणे यांनी ठेकेदाराशी मोबाईलद्वारे संवाद साधल्यानंतर उद्यापर्यंत टोलवसुली तात्पुरती थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याबाबत पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. जिल्ह्यावरुन देखील बंदोबस्त मागविण्यात आला होता.