धनगर आरक्षणासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोरच रस्त्यावर ठिय्या

धनगर समजाला एस. टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निवासस्थान असलेल्या बारामती शहरातील सहयोग सोसायटी समोर भिगवण रोडवर धनगर समाजातील युवकांनी ठिय्या आंदोलन करून घोषणाबाजी केली.

    बारामती: धनगर समजाला एस. टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निवासस्थान असलेल्या बारामती शहरातील सहयोग सोसायटी समोर भिगवण रोडवर धनगर समाजातील युवकांनी ठिय्या आंदोलन करून घोषणाबाजी केली.

    बारामती शहरातील प्रशासकीय भवन या शासकीय मध्यवर्ती इमारती समोर चंद्रकांत वाघमोडे पाटील यांनी गेले दहा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. अद्यापही राज्य सरकारमधील जबाबदार मंत्री आंदोलनाच्या ठिकाणी येत नसल्याने धनगर समाजामध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संतप्त धनगर समाजांनी प्रत्येक आमदार खासदाराच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर धनगर समाजातील कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी एकत्र जमा झाले. मात्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने सहयोग भवन सोसायटीच्या समोर आंदोलन करण्यास पोलिसांनी विरोध केला. याठिकाणी सहयोग सोसायटीच्या गेटवर ठिय्या करण्यास पोलिस उपअधिक्षक गणेश इंगळे यांनी विरोध केला.

    त्यामुळे आंदोलकांनी बारामती भिगवण रोडवर सहयोग भवन समोर ठिय्या मांडला. यावेळी बाहेर निघा, बाहेर निघा, अजित पवार बाहेर निघा!!, या लोकप्रतिनिधीचं करायचं काय?…,आरक्षण आमच्या हक्काचं! नाही कोणाच्या बापाचं!!, येळकोट, येळकोट, जय मल्हार!!अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड अमोल सातकर म्हणाले, गेली दहा दिवसांपासून बारामती शहरात चंद्रकांत वाघमोडे पाटील हे धनगर आरक्षणासाठी आमरण उपोषणास बसले आहेत. मात्र या आंदोलनाकडे बारामतीचे लोकप्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठ फिरवली आहे. अन्नाचा कणही चंद्रकांत वाघमोडे यांनी घेतलेला नाही, तरीदेखील अजित पवार या ठिकाणी फिरकले नाहीत हे दुर्दैवी आहे. धनगर समाजाचा वापर फक्त निवडणुकीपुरता नेत्यांनी केला आहे. राज्य सरकार धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. धनगर समाजाला एसटीचे आरक्षण तातडीने लागू करण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा सातकर यांनी यावेळी दिला. चंद्रकांत वाघमोडे आंदोलन करत असलेल्या ठिकाणी चार ते पाच पोलीस तैनात केले जात आहेत, मात्र उपमुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या सहयोग भवन परिसरात आंदोलन होणार असल्याने मोठ्या संख्येने पोलीस फौजफाटा आणून आंदोलकांवर दबाव टाकला जात आहे याचा आम्ही निषेध करत असल्याचे सातकर यांनी यावेळी सांगितले.

    यावेळी इतरही कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत धनगर आरक्षण अंमलबजावणी तातडीने करावी अशी आग्रही मागणी केली. यावेळी भाजप चे अभिजीत देवकाते, वैभव सोलनकर, ॲड गोविंद देवकाते, अहिल्या क्रांती सेनेच्या अध्यक्षा कल्याणी वाघमोडे, जगदीश कोळेकर, महादेव कोकरे, ॲड दिलीप धायगुडे यांच्यासह इतर कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.