बारामतीतील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी नगर परिषदे समोर आंदोलन

बारामती शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन देखील कारवाई झाली नसल्याने आज काही नागरिकांनी बारामती नगर परिषद समोर आदोलन केले.

    बारामती : बारामती शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन देखील कारवाई झाली नसल्याने आज काही नागरिकांनी बारामती नगर परिषद समोर आदोलन केले. भटकी कुत्री येणाऱ्या- जाणाऱ्या लोकांचा पाठलाग करतात, तसेचं शहराच्या स्वच्छतेला सुद्धा बाधा येत आहे आणि बारामती स्वच्छ, सुंदर करण्यास देखील अडथळा ठरणार आहे, असे आंदोलकांनी दिलेल्या निवेदनात म्हंटल आहे.

    भटक्या कुत्र्यांच्या वावरामुळे शहरातील नागरिकांना अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागत असून या भटक्या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेतला आहे. कुत्र्याने चावा घेतल्यानंतर अनेकदा शासकीय रुग्णालयात रेबीजचे इंजेक्शन देखील उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

    ही भटकी कुत्री येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांचा पाठलाग करतात, त्यामुळे लहान मुले, वृद्धांच्या मनात दहशत निर्माण होत आहे. एकाच वेळी २०-२५ कुत्री घोळक्याने फिरल्याने रस्त्यावर फिरणे देखील मुश्कील होत आहे . कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज पहाटेच्या वेळी किंवा रात्री आणखी वाढतो. ही कुत्री रात्रभर भुंकुन शांतता भंग करतात. सर्वात महत्वाचे म्हणजे या भटक्या कुत्र्यामुळे शहराच्या स्वच्छतेला सुद्धा बाधा येत आहे आणि बारामती स्वच्छ, सुंदर करण्यास देखील अडथळा ठरणार आहे असे या निवेदनात म्हंटल आहे.

    यावेळी, भार्गव पाटसकर, निलेश बाबळे, धीरज पवार, गणेश कदम, चंद्रकांत पवार, शुभम मोरे, समीर ढोले, चारुदत काळे, पार्थ गालिंदे, उमेश दुबे, सुनील शिंदे, प्रविण धनराळे, सोमनाथ पाटोळे, सुरेंद्र जेवरे, अनंत शिंदे, मंगेश मासाळ, गणेश वणवे, आदित्य खरात आदी उपस्थित होते.

    याबाबत मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले की, नगरपरीषद प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचे लसीकरण व नसबंदीची टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच बारामती शहरापासून थोडं लांब कोंडवाडा तयार करून भटक्या कुत्र्यांवर नसबंदी करण्यात येणार असल्याचे महेश रोकडे म्हणाले.