अमानुष मारहाण करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी माळेगावमध्ये आंदोलन ; कडकडीत बंदसह रास्ता रोको 

अमानुष मारहाण करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दौंड व बारामती येथील अधिकारी व हप्ता वसुल करणाऱ्या खासगी एजंट विरोधात गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी समस्त गोपाळ समाज बांधवांनी माळेगाव कडकडीत बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तर तब्बल दोन तासाहुन अधिक वेळ निरा-बारामती हा राज्यमार्ग आंदोलकांनी रोखुन धरला होता.

    शिवनगर: अमानुष मारहाण करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दौंड व बारामती येथील अधिकारी व हप्ता वसुल करणाऱ्या खासगी एजंट विरोधात गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी समस्त गोपाळ समाज बांधवांनी माळेगाव कडकडीत बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तर तब्बल दोन तासाहुन अधिक वेळ निरा-बारामती हा राज्यमार्ग आंदोलकांनी रोखुन धरला होता.

    बारामती तालुक्यातील माळेगाव येथे राज्य उत्पादन शुल्क विभाग दौंड व बारामती येथील अधिकारी व‌ हप्ता वसुली करणाऱ्या खासगी एजंटने अवैध धंद्यावर धाड टाकताना एका गरोदर महिलेसह धनगर कुटुंबातील इतर लोकांना अमानुष मारहाण केली होती आठ दिवस उलटले तरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याने सदर गुन्हा दाखल होण्यासाठी समस्त गोपाळ समाजाने माळेगाव बंदसह पोलिस ठाण्या लगत निरा- बारामती राज्यमार्ग रोखुन रास्ता रोको आंदोलन केले.

    छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पोलिस ठाणे असा मोर्चा काढण्यात आला पोलिस ठाण्या लगत निरा- बारामती राज्यमार्ग रोखुन धरत निषेध सभा झाली.या सभेत कारखान्याचे माजी अध्यक्ष व संचालक रंजन तावरे,सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र टिंगरे,ॲड.शाम कोकरे,ॲड.दिलिप गि-हे यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करुन पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.यावेळी माजी सरपंच जयदीप तावरे,माजी उपसरपंच अजित तांबोळी,अशोकराव सस्ते,प्रमोद तावरे यांच्यासह गोपाळ समाजातील पिंटु गव्हाणे,युवराज धनगर, जनार्दन धनगर,संदीप गव्हाणे,महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.अमानुषपणे मारहाण झालेली गरोदर महिला प्रियंका पवार व मंदा जनार्दन धनगर यांच्यासह गोपाळ समाजातील महिलांनी न्यायासाठी जोरदार केलेला आक्रोषामुळे घटनेबाबत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

    आंदोलनात अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी सुपा पोलिस ठाणे वगळता बारामती शहर पोलिस निरीक्षक दिनेश तायडे,बारामती ग्रामीणचे पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे,वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे या अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचारी व होमगार्ड,तसेच माळेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.तब्बल दोन तासाहुंन अधिक वेळ रास्ता रोको केल्याने दोन्ही बाजूला एक किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या यामुळे वहातुक ठप्प झाली होती तसेच आंदोलकांनी निषेधाच्या घोषणा देत न्याय द्या अशी मागणी करत होते.

    सदर घटनेची सत्यता पडताळून या घटनेची संपूर्ण व‌ सखोल चौकशी करून तो अहवाल वरिष्ठांना देण्यात येईल.वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल.या घटनेतील दोषींची गय केली जाणार नाही.

    गणेश इंगळे - उपविभागीय पोलिस अधिकारी.

    सदर घटनेतील दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यास पोलिस चालढकल का करीत आहेत दोषींवर गुन्हा दाखल न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल.

    रंजनकुमार तावरे - माजी अध्यक्ष, माळेगाव कारखाना

    एक्साईजचे अधिकाऱ्यांची अवैध धदेवाल्यांशी व्यावसायिक भागिदारी आहे त्यांनी पैसे घेतल्याचे पुरावे आहेत अशा अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.

    मच्छिंद्र टिंगरे - सामाजिक कार्यकर्ते