पाणी देण्यावरून कडकडीत बंद ; दूध नदीकाठच्या शेतकऱ्यांचा विराेध

दूधगंगा नदीचे पाणी इचलकरंजीला सुळकुड येथून देण्याच्या विरोधात शिरोळ तालुक्यातील घोसरवाड, दत्तवाड, दानवाड, टाकळीवाडी येथे कडकडीत बंद पाडळून शासनाच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला.

    कुरुंदवाड : दूधगंगा नदीचे पाणी इचलकरंजीला सुळकुड येथून देण्याच्या विरोधात शिरोळ तालुक्यातील घोसरवाड, दत्तवाड, दानवाड, टाकळीवाडी येथे कडकडीत बंद पाडळून शासनाच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला.

    अमृत दोन योजनेअंतर्गत इचलकरंजी शहराला कागल तालुक्यातील सुळकुड येथून दूधगंगा नदीचे थेट पाईपलाईनने पाणी देण्याच्या योजनेला शासनाने मंजुरी दिली असून १६१ लाख रुपयांच्या या योजनेला दूधगंगा नदी काठावरील गावातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे  इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या पंचगंगा नदी व कुरुंदवाड येथील कृष्णा नदीतून थेट पाईपलाईन द्वारे पाणी पुरवठा योजना यापूर्वी सुरू आहे. कृष्णा पाणी योजनेला गळती असल्यामुळे अपुरा पाणीपुरवठा होतो. यामुळे शासनाने नवी पाणीपुरवठा योजना करण्याचे ठरवले. यापूर्वी वारणा नदीतून पाणी योजनेचे नियोजन केले होते. पण येथील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे ती योजना बंद करून कागल तालुक्यातील सुळकुड येथील दूधगंगा नदीची योजना मंजूर करण्यात आली. ही योजना रद्द करावी, अशी दूधगंगा कृती समितीची मागणी आहे. यावेळी सरपंच चंद्रकांत कांबळे, राजगुंड पाटील, बाळासो कोकणे, सुरेश पाटील, विवेक चौगुल,  राजू पाटील, सोमनाथ माने, भाऊसो चौगुले यांच्यासह कृती समितीचे सदस्य, शेतकरी उपस्थित होते. कुरुंदवाड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

     पाणी कमी पडणार
    या योजनेमुळे दूधगंगा नदीकडच्या नागरिकांना पाणी कमी पडणार आहे. यामुळे ही योजना रद्द करावी, यासाठी शिरोळ तालुक्यातील दूधगंगा नदीकाठी असणाऱ्या दत्तवाड, जुने दानवाड, नवे दानवाड, घोसरवाड,  टाकळीवाडी या गावातील नागरिकांनी एक दिवसाचा कडकडीत बंद पाळून शासनाचा निषेध केला.