आंदोलकांनी पेटवला ऊस ट्रॅक्टर; इंदोली येथील घटना

कराड तालुक्यात ऊस दर आंदाेलनाला हिंसक वळण लागले. इंदोली गावाच्या हद्दीत कारखान्यासाठी ऊस घेऊन निघालेल्या ट्रॅक्टर चालकाला खाली खेचून मारहाण करून ट्रॅक्टरवर डिझेल टाकून ट्रॅक्टर जाळला. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

    कराड : कराड तालुक्यात ऊस दर आंदाेलनाला हिंसक वळण लागले. इंदोली गावाच्या हद्दीत कारखान्यासाठी ऊस घेऊन निघालेल्या ट्रॅक्टर चालकाला खाली खेचून मारहाण करून ट्रॅक्टरवर डिझेल टाकून ट्रॅक्टर जाळला. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी ८ ते ९ जणांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ट्रॅक्टर चालक नानासाहेब शांतीलाल देवकाते (वय २८, रा. बंगाली पिंपळा, ता. गेवराई) यांनी फिर्याद दिली.

    इंदोली गावाच्या हद्दीत उंब्रज ते धावरवाडी (चोरे) जाणाऱ्या रस्त्यावर डाळींबीची बाग नावच्या शिवाराजवळ मुंगळा ट्रॅक्टर ऊसाने भरून जयवंत शुगर कारखान्यास ऊस घालण्यासाठी निघाला असता, ८ ते ९   जणानी राजू शेट्टी यांच्या नावाच्या घोषणा देत ट्रॅक्टर थांबवविला. ‘तुला शेतकरी संघटनेचे आंदोलन माहीत नाही का’? असे म्हणून फिर्यादीला ट्रॅक्टरमधून खाली खेचून मारहाण करून मोबाईल शेतात फेकून दिला. ट्रॅक्टरच्या व ट्रॉलीच्या टायरावर डिझेल टाकून पेटत्या मशालीने ट्रॅक्टर पेटवून देण्यात आला. यामध्ये ट्रॅक्टर जळून खाक झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी ८ ते ९ जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक्षक अजय गोरड करत आहेत.