शेतकऱ्यांना ‘महाबीज’चे बियाणे तत्काळ उपलब्ध करा; राष्ट्रवादीची जिल्हा प्रशासनाकडे मागणी

यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात महाबीजच्या बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात. कारखान्यांकडील थकीत ऊस देयके शेतकऱ्यांना अदा करावीत, आदी मागण्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत.

    परभणी : यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात महाबीजच्या बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात. कारखान्यांकडील थकीत ऊस देयके शेतकऱ्यांना अदा करावीत, आदी मागण्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत.

    दरम्यान अप्पर जिल्हाधिकारी राजेश काटकर यांना शुक्रवारी (ता.१०) मागण्यांचे निवदेन देण्यात आले. खरिपाच्या पेरणीसाठी खते, बी-बियाणे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात येत आहेत. परंतु काही विशिष्ट प्रकारची खते, बियाणे उपलब्ध होत नाहीत. काही बियाणे जास्त भावाने विकले जात आहेत, अशा तक्रारी येत आहेत. बियाणे उपलब्ध होण्यासाठी महाबीज व इतर सर्व यंत्रणांसोबत बैठक घ्यावी. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खते, बियाण्यांचा तुटवडा निर्माण होणार नाही, या बाबत दक्षता घ्यावी.

    तसेच जिल्ह्यातील कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाची देयके एफआरपीनुसार शेतकऱ्यांना अदा केलेली नाहीत. त्यामुळे खरीप पेरणीसाठी निविष्ठा खरेदीसाठी शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. देयके अदा करण्याच्या अनुषंगाने तत्काळ कार्यवाही करावी, आदी मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार फौजिया खान, माजी खासदार सुरेश जाधव, भावना नखाते, प्रा. किरण सोनटक्के, संतोष देशमुख, नंदा राठोड, अजय गव्हाणे, सुमंत वाघ, सिध्दार्थ भराडे, सिद्धांत हाके, कल्पना दळवी आदींनी दिले.