सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या अनागोंदीबाबत शुक्रवारी जनआंदोलन 

सामाजिक संस्थांसह नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन

    सातारा : येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध उद्या शुक्रवारी दि.१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असून त्यात सहभागी होण्याचे आवाहन संयोजक शंकर माळवदे, महारुद्र तिकुंडे, सुशांत मोरे, पद्माकर सोळवंडे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
    याबाबत अधिक माहिती अशी की, साताऱ्यातील राजधानी टॉवर्समध्ये असलेल्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयातून विविध प्रकरणांबाबत येणाऱ्या पक्षकारांना मुद्दामहून त्रास दिला जात असल्याचा अनुभव अनेकांना येत असतो. विविध प्रकरणी घेऊन येणाऱ्या पक्षकारांना संबंधित कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून जाणीवपूर्वक त्रास देणे, मनमानी तारखा देणे, विनाकारण पक्षकारांचा प्रस्ताव नामंजूर करणे, आर्थिक तडजोडी करणे, त्या न झाल्यास फौजदारी कारवाई करण्याचे सांगितले जाते आहे. याबाबत या कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची  खातेनिहाय सखोल चौकशी करून, पक्षकार, सामाजिक संस्था, संघटना यांना न्याय द्यावा. संबंधीत सहाय्यक धर्मादाय आयुक्त या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी यासाठी जिल्ह्यातील सर्व गणेश आणि दुर्गा मंडळ, शिक्षण संस्था, सामाजिक संस्था, वाचनालय, देवस्थान यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 डिसेंबर रोजी धरणे आंदोलनासाठी एकत्र यावे असे आवाहन संयोजक संयोजक शंकर माळवदे, महारुद्र तिकुंडे, सुशांत मोरे, पद्माकर सोळवंडे यांनी केले आहे.
    संयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार सामाजिक कार्यातील विविध न्यासांचे लेखापरिक्षण धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार त्यांच्या संकेतस्थळावर न्यासांनी दाखल केल्यानंतर कार्यालयात जावून दाखल करतेवेळी संबंधित कार्यालयाचे कर्मचारी, अधिकारी अनेक त्रुटी जाणूनबूजून दाखवून पक्षकारांना नाहक त्रास देत आहेत. तसेच लेखापरिक्षण अहवाल संकेत स्थळावर दाखल केल्यानंतर पुन्हा समक्ष घेण्याची जरूरत नाही किंवा त्यासाठी संकेतस्थळ अथवा समक्ष देण्यापैकी एकच पर्याय असावा. त्याप्रमाणे आदेश निर्गमित व्हावेत. निरीक्षकाने केलेल्या चौकशी अहवालावर त्वरीत निर्णय घेण्याऐवजी वर्षानुवर्ष न्यायिक स्वरूपाचे कामकाज चालवतात, त्यामुळे भ्रष्टाचारास खतपाणी घालण्याचा प्रकार होत असून निरीक्षकाच्या अहवालावर निर्णय घेण्याची कालमर्यादा ठरविण्यात यावी.
    सातारा कार्यालयात सहा.धर्मादाय आयुक्त यांची २ पदे मंजूर असताना गेली अनेक वर्षे सहा. धर्मादाय आयुक्त १ च पद कार्यरत आहे. तरी २ रे पदावर सहा. धर्मादाय आयुक्त यांची नियुक्ती करण्यात यावी.कार्यालयीन उच्च पदस्थ अधिकारी, कर्मचारी वर्ग हे  मनमानीपणे सुनावण्याचा तारखा नेमणे, निकालाची भीती दाखवून त्यांच्याकडून वाहनांची सोय करून घेणे, पर्यटनस्थळी जावून आनंद उपभोगणे वगैरे केल्या जात आहेत. याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे झाले आहे. सहा. धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये अनेक पक्षकार, वयोवृद्ध दिव्यांग हे कामकाजासाठी येत असतात परंतु वेगवेगळी कारणे सांगून प्रस्ताव नामंजूर केले जातात.
     सातारा नगरपरिषदेने संबधित कार्यालयाचा बांधकाम परवाना मंजूर करून अनेक वर्ष उलटली तरी काम संथ गतीने सुरू आहे त्याचा त्रास दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना होत आहे तरी बांधकाम त्वरित पूर्ण करावे.तसेच नामजूंर प्रस्तावांची सखोल चौकशी करण्यात यावी. अधिकारी, कर्मचाऱ्यांना सौजन्य काय असते याबाबत शिक्षण देणे जरूरीचे आहे.पक्षकारांना दमदाटीची, भीती दाखवली जात आहे. असे आंदोलनकर्त्याकडून सांगण्यात आले.
     गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना नाहक त्रास  
    गणेशोत्सव, दुर्गात्सवावेळी  शासनाच्या आदेशांचे व धर्मादाय आयुक्तांच्या परिपत्रकांना डावलून मंडळांना नाहक त्रास दिला जातो, आर्थिक तडजोडी केल्या जातात याचीही चौकशी करण्यात यावी. तसेच न्यासांच्या गैरकारभाराविरूध्द केलेल्या तक्रारी, चौकशी वर्षांनुवर्ष कर्मचा-यांच्या दप्तर दिरंगाई, वेळकाढूपणा, आर्थिक तडजोडीमुळे प्रलंबित आहेत. या सर्व मुद्यांची खातेनिहाय सखोल चौकशी करून, पक्षकार, सामाजिक संस्था, संघटना यांना न्याय देऊन संबंधितावर कारवाई करावी.