नेवासा भूमिअभिलेख कार्यालयात सल्ला देण्याऐवजी दिली जातेय उर्मटपणाची वागणूक

नेवासा फाटा येथे असलेल्या उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात कामानिमित्त आलेल्या ग्रामीण भागातील जनतेचे काम तर एका भेटीत होतच नाही. उलट कामासाठी आलेल्या लोकांना आवश्यक सल्ला देण्याऐवजी उर्मटपणाची वागणूक देऊन अपमानित करण्यात येत असल्यामुळे 'भीक नको, पण कुत्रा आवर' म्हणण्याची वेळ येत आहे.

    नेवासा : नेवासा फाटा येथे असलेल्या उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात कामानिमित्त आलेल्या ग्रामीण भागातील जनतेचे काम तर एका भेटीत होतच नाही. उलट कामासाठी आलेल्या लोकांना आवश्यक सल्ला देण्याऐवजी उर्मटपणाची वागणूक देऊन अपमानित करण्यात येत असल्यामुळे ‘भीक नको, पण कुत्रा आवर’ म्हणण्याची वेळ येत आहे.

    या कार्यालयात कर्मचाऱ्यांवरच अधिकाऱ्यांचा अंकुश नसल्यामुळे कर्मचारी वेळेत काम न करता आलेल्या लोकांवरच आपली ‘पॉवर’ दाखवत असल्याचे दिसून येत असून, कामासाठी आलेला माणूस पश्चाताप करुन घरची वाट धरत असल्यामुळे या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आवर कोण घालणार? असा यक्ष सवाल निर्माण झाला आहे.

    भूमि अभिलेख शाखेत जमीन मोजणीसाठी अतितातडीचे पैसे भरुनही तीन-चार महिन्यातही मोजणी येत नाही. मग तातडीचे पैसे भरुन उपयोग काय? असा सवाल कामानिमित्त कार्यालयात आलेल्या लोकांकडून उपस्थित केला जात आहे. जादा पैसे कर्मचारी घेतात. तरीही कामानिमित्त आलेल्या लोकांनाच उडवाउडवीचे उत्तरे देऊन येथील कर्मचारी कामानिमित्त आलेल्या लोकांनाच दम भरत असल्यामुळे दाद कोणाकडे मागायची? असा सवालही जनतेतून व्यक्त केला जात आहे. या कार्यालयाच्या कारभारात सुधारणा करण्याची गरज असल्याचेही आता जनतेतून बोलले जात आहे.