मालाड मालवणीच्या आझमी नगरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी “पी” उत्तर मनपा कर्यालयावर जनआक्रोश मोर्चा

    मुंबई : मालवणी आझमी नगरातील नागरिकांना पाणी, मीटर, गटर, रस्ते आदी सुविधा पुरविल्या जात नसल्याने आणि रस्त्यांवरील कचऱ्याचे ढीग साफ न होत असल्याने संतप्त झालेल्या समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माजी नगरसेवक सिरिल डिसोझा यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्रवीर सावरकर चौक ते “पी”उत्तर महानगरपालिका कार्यालयावर स्थानिक नागरिकांनी सोमवारी “प्रचंड मोर्चा” काढला.

    स्थानिकांना डेंग्यू, मलेरियासारखे गंभीर आजार

    यावेळी गटारीची साफसफाई होत नसल्यामुळे स्थानिकांना डेंग्यू, मलेरिया आदी गंभीर आजारांचा सामना करावा लागत असून, याला पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे आणि महापालिकेचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप डिसोझा यांनी केला.

    समाजवादी पार्टीचे शेकडो कार्यकर्ते मोर्चात सहभागी

    या वेळी स्थानिक नागरिकांसोबत समाजवादी पार्टीचे शेकडो कार्यकर्ते मोर्चेत सहभागी झाले होते. यात जिल्हाध्यक्ष गिरिजाशंकर यादव, महासचिव कुबेर मौर्या, नगरसेविका अनशन सिद्दीकी यांनी प्रशासनाला जाब विचारला.

    निवेदन स्विकारण्यास नकार

    दरम्यान, यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या प्रसंगी कार्यकर्त्यांची पोलिसां सोबत शाब्दिक बाचाबाची झाली. तर सहाय्यक आयुक्त किरण दीघावकर यांनी निवेदन स्विकारण्यास नकार दिल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

    प्रमुख मागणी लावून धरत जोरदार घोषणाबाजी

    दरम्यान, नागरिकांनी प्रमुख मागणी लावून धरत जोरदार घोषणाबाजी केली. त्याचबरोबर गटारीची साफसफाई होत नसल्यामुळे स्थानिकांना डेंग्यू, मलेरिया आदी गंभीर आजार होत असून याला पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे आणि महापालिकेचे अधिकारी जबाबदार असल्याचा दावा डिसोझा यांनी केला.