नाशिकमध्ये होणार अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा; पंतप्रधान मोदी पिंपळगावात तर ठाकरे, पवार…

लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election) प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. अशातच आज (दि.15) जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या तोफा धडाडणार आहेत.

  नाशिक : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election) प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. अशातच आज (दि.15) जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या तोफा धडाडणार आहेत. अंतिम टप्प्यातील या प्रचारसभांमुळे निवडणुकीचा माहोल बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी लोकसभेसाठी येत्या 20 मे रोजी मतदान होणार आहे.

  शरद पवार व उद्धव ठाकरे हे दोघे नाशिक येथे मुक्कामी आहेत. शरद पवार हे दुपारी दोन वाजता हेलिकॉप्टरने नाशिकमध्ये दाखल होतील. हॉटेल एमराल्ड येथे काही वेळाच्या विश्रांतीनंतर ते वणीच्या सभेसाठी दाखल होतील. सभा आटोपून पवार हे पुन्हा नाशकात येणार आहेत. याच दरम्यान ठाकरे देखील सभा आटोपून नाशकात मुक्कामी राहणार असल्याने दोन्ही नेत्यांची भेट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  शरद पवार मनमाड, सटाण्यात घेणार सभा

  शरद पवार हे दोन दिवस नाशिकला थांबणार असून, बुधवारची सभा झाल्यानंतर गुरूवारी (दि.16) सकाळी ते सटाणा येथे धुळे लोकसभा मतदारसंघाच्या कॉंग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांच्यासाठी प्रचारसभा घेतील. त्यानंतर पुन्हा नाशिकला येतील व सायंकाळी मनमाड येथे भास्कर भगरे यांच्यासाठी पवार यांची जाहीरसभा होणार आहे.

  महायुतीची सारी भिस्त मोदींवरच

  मोदी यांनी 2014 व 2019 मध्येही नाशिक जिल्ह्यात प्रचारसभा घेतल्या होत्या. या दोन्ही सभा पक्षासाठी लाभदायी ठरून दोन्ही उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे महायुतीची सारी भिस्त मोदी यांच्यावरच असून, पिंपळगावची सभा यशस्वी करण्यासाठी नेत्यांनी ताकद पणाला लावली आहे.

  उद्धव ठाकरेंची गोल्फ क्लब मैदानात सभा

  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सायंकाळी पाच वाजता गोल्फ क्लब मैदानावर सभा होत आहे. मोदी पिंपळगावच्या सभेत काय बोलतात त्यावर पवार व ठाकरे काय उत्तर देतात याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.