अंतिम प्रभाग रचनेला प्रसिद्धी, आता लक्ष आरक्षणाकडे; २५ प्रभागांसाठी सातारकर करणार मतदान

सातारा पालिकेच्या (Satara Nagar Palika) २५ प्रभागांच्या अंतिम नकाशाला राजपत्रात प्रसिद्धी देण्यासाठी जिल्ह्याचे जिल्हा प्रकल्प संचालक तथा सातारा नगरपालिकेचे प्रशासन व मुख्याधिकारी अभिजित बापट गुरुवारी पुण्याला रवाना झाले.

    सातारा : सातारा पालिकेच्या (Satara Nagar Palika) २५ प्रभागांच्या अंतिम नकाशाला राजपत्रात प्रसिद्धी देण्यासाठी जिल्ह्याचे जिल्हा प्रकल्प संचालक तथा सातारा नगरपालिकेचे प्रशासन व मुख्याधिकारी अभिजित बापट गुरुवारी पुण्याला रवाना झाले. राजपत्रित प्रभाग रचनेचा नकाशा येत्या सोमवारी प्रसिद्ध होण्याची शक्यता असून, सातारा पालिकेने अंतिम प्रभाग रचनेचा नकाशा आपल्या दर्शनी भागांमध्ये प्रसिद्ध केला.

    या नकाशानुसार २५ प्रभागासाठी तब्बल एक लाख 80 हजार 568 सातारकर यंदा मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे सातारा पालिकेच्या राजकीय घडामोडींना साधारण गणपती विसर्जनानंतर येण्याची चिन्हे आहेत.

    प्रभाग रचना प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे आता आरक्षण सोडतीची उत्सुकता भावी मेहरबानांना लागलेली आहे. अंतिम प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्याला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. या प्रभाग रचनेच्या प्रसिद्धीसाठी जिल्हा प्रशासनाची यंत्रणा गुरुवारी पुण्याला रवाना झाली. या प्रभाग रचनेचा नकाशा सातारा पालिकेच्या निवडणूक शाखेने पालिकेच्या दर्शनी भागांमध्ये प्रसिद्ध केला आहे.

    यंदा शहराच्या हद्दवाढीमुळे एकूण 25 प्रभाग आणि 50 उमेदवार असे चित्र असून, या प्रभागांसाठी एक लाख 80 हजार 568 मतदार मतदान करणार आहेत. यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 21,800 असून, अनुसूचित जमातीची लोकसंख्या 2057 इतकी आहे. 50 टक्के आरक्षणानुसार, 25 महिला व 25 पुरुष यंदा सातारकरांना निवडून द्यावयाचे आहेत.

    यामध्ये अनुसूचित जातीचे 6 व अनुसूचित जमातीचा एक उमेदवार निवडून द्यावयाचा आहे. हद्दवाढीमुळे अनुसूचित जमातीचा नगरसेवक पहिल्यांदाच सातारा पालिकेच्या इतिहासात निवडला जाणार आहे, यंदाचे वैशिष्ट्य मानावे लागेल.