मौजमजा करण्यासाठी पल्सर २२० चोरणाऱ्यास ठोकल्या बेड्या

-दत्तवाडी पोलिसांची कारवाई ; दोन अल्पवयीनांसह तिघांना पकडले

    पुणे : मौजमजा करण्यासाठी तसेच शौक म्हणून केवळ पल्सर २२० या गाड्यांची चोरी करणाऱ्या महाभाग चोरट्याला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. तर, तो त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने या गाड्या चोरत असल्याचेही समोर आले आहे.

    रोहित विष्णु क्षीरसागर (वय २२, रा. जनता वसाहत) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून दत्तवाडीतील ४ व विश्रामबागमधील एक असे पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्याकडून पोलिसांनी १९० हजार रुपयांच्या ४ दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय खोमणे तसेच पथकाचे उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, कुंदन शिंदे, दयानंद तेलंगे पाटील व त्यांच्या पथकाने केली आहे.

    -वाहन चोरट्यांचा शहरात धुमाकूळ
    शहरात वाहन चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दररोज सरासरी चार ते पाच वाहने चोरीला जात आहेत. पण, या चोऱ्या रोखण्यात पोलिसांना अपयश येत आहे. यापार्श्वभूमीवर चोरट्यांची माहिती काढून जेरबंद करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. दत्तवाडी पोलीस हद्दीत गस्त घालत होते. यावेळी पोलीस अंमलदार प्रमोद भोसले, पुरूषोत्तम गुन्ला व दयानंद तेलंगे पाटील यांना माहिती मिळाली की, जनता वसाहत बागेजवळून पल्सर २२० ही दुचाकी चोरणारा जयभवानीनगर येथे आला आहे. त्यानूसार, पथकाने रोहित याला सापळा रचून याठिकाणी पकडले. त्याच्याकडे चौकसी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.

    पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर त्याने या दुचाकी चोरीची कबूली दिली. त्याला अटककरून सखोल तपास केल्यानंतर त्याच्याकडून ५ गुन्ह्यांची उकल झाली. विशेष म्हणजे तो शौक व मौजमजा करण्यासाठी महागड्या आणि पल्सर २२० दुचाकी चोरत असल्याचेही समोर आले आहे.