प्रशासनाकडून ३०३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची तयारी सुरू; लवकरच वाजणार बिगूल

ग्रामपंचायतींच्या निवडणुका (Gram Panchayat Election) कोरोना महामारीमुळे रखडल्या असून, 2022 मध्ये मुदत संपणार्‍या आणि नव्याने स्थापित झालेल्या अशा एकूण 303 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. या ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत काढण्यात आली.

    पुणे : ग्रामपंचायतींच्या निवडणुका (Gram Panchayat Election) कोरोना महामारीमुळे रखडल्या असून, 2022 मध्ये मुदत संपणार्‍या आणि नव्याने स्थापित झालेल्या अशा एकूण 303 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. या ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत काढण्यात आली.

    त्यामध्ये ओबीसी आरक्षण वगळून अनुसूचित जाती आणि जमातींचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. जिल्ह्यातील 303 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगूल कोणत्याही क्षणी वाजू शकते.

    जिल्ह्यात नव्याने 17 ग्रामपंचायती स्थापित झाल्या असून, त्यात भोर, इंदापूर, खेड आणि हवेली तालुक्यात प्रत्येकी दोन, जुन्नर तालुक्यात चार, तर शिरूर तालुक्यात पाच ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 2021 मध्ये 58 ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने निवडणुका घेता आल्या नाहीत.

    यामध्ये सर्वाधिक 32 ग्रामपंचायती जुन्नर तालुक्यातील असून, आंबेगाव 15, बारामती व इंदापूर प्रत्येकी दोन, तर मावळ, मुळशी आणि हवेली तालुक्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

    जिल्ह्यातील तब्बल 228 ग्रामपंचायतींची मुदत संपणार असून, निवडणूक घेण्याची तयारी सुरू झाली आहे. भोर तालुक्यातील सर्वाधिक 54 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यापाठोपाठ जुन्नर 53, आंबेगाव 39, वेल्हा 28, इंदापूर 26, खेड 28, मुळशी आणि हवेली प्रत्येकी 12, शिरूर आणि मावळ प्रत्येकी 10, दौंड 8, तर पुरंदर तालुक्यातील केवळ 2 ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. एकूण 303 ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.