पुण्याची हवा ‘अतिवाईट’ श्रेणीत! पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात  प्रदूषण  वाढलं

आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन

    पुणे: नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनानंतर फोडलेल्या फटाक्यांमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील हवा बिघडली आहे. सफरच्या हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार पुण्याची हवा ‘अतिवाईट’ श्रेणीत आहे.

    गेल्या काही दिवसांमध्ये प्रदूषणामुळे हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसामुळे जमिनीवर राहणारे धुलिकण हवेत जाऊन हवा प्रदूषित होते. वाहनांचा धूर, बांधकामे, फटाके यामुळे त्यात भर पडते. गेल्या काही दिवसांत मुंबईप्रमाणेच पुण्यातील हवेची गुणवत्ता बिघडल्याचे हवा गुणवत्ता निर्देशांकातील आकडेवारीतून दिसून आले होते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्यात आले. त्याशिवाय वायू प्रदूषण रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेकडून मार्गदर्शक सूचनाही प्रसिद्ध करण्यात आल्या.दिवाळीचा सण ९ नोव्हेंबरपासून सुरू झाल्यावर फटाके उडवण्यास सुरुवात झाली. रविवारी नरक चतुर्दशी असल्याने पहाटेपासूनच फटाके उडवण्यास सुरुवात झाली. दिवसभर शहरात ठिकठिकाणी फटाके उडवणे सुरूच होते. तर सायंकाळी लक्ष्मी पूजनानंतर मोठ्या प्रमाणात फटाके उडवण्यात आले. त्यात बॉम्ब, माळांसारख्या आवाजी फटाक्यांसह आकाशात फुटणाऱ्या रोषणाईच्या फटाक्यांचाही समावेश होता. त्यामुळे प्रदूषण कमी करणे, हवेच्या गुणवत्तेकडे दुर्लक्षच झाल्याचे दिसून आले. शहर आणि पिंपरी चिंचवड परिसरात रात्री उशिरापर्यंत फटाक्यांची आतषबाजी सुरू राहिल्याने हवेची गुणवत्ता अतिवाईट श्रेणीमध्ये गेली आहे.

    पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील प्रामुख्याने शिवाजीनगर, पाषाण, लोहगाव, कोथरूड, भूमकर चौक, भोसरी, निगडी, आळंदी या भागांतील हवेची गुणवत्ता प्रचंड प्रमाणात बिघडली आहे. हवेतील धुलिकणांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे श्वसनाला त्रास होणे, धाप लागणे, दम लागणे अशा आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. अस्थमासारखा आजार असलेल्यांनी जास्त काळजी घेणे आवश्यक आहे.