पुण्यातील शास्त्रज्ञ दाम्पत्याला प्रजासत्ताक दिनाच्या साेहळ्याचे निमंत्रण; संशाेधनाची केंद्र सरकारकडून दखल

दिल्लीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी पुण्यातील या दाम्पत्याला विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.

    पुणे : जैविक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी संशोधन करून एकस्व अधिकार (पेटंट) प्राप्त केलेल्या डॉ. रेणुका बल्लाळ आणि डॉ. भरत बल्लाळ यांच्या विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. दिल्लीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी पुण्यातील या दाम्पत्याला विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.

    विज्ञान तंत्रज्ञानाच्या महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या संशोधकांना यंदा प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यात बल्लाळ दाम्पत्याचा समावेश आहे. या संशोधनाची दखल घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी निमंत्रित केल्याचा आनंद डॉ.भरत बल्लाळ यांनी व्यक्त केला.

    कचरा जाळताना जंतुसंसर्ग टाळणारे जगातील एकमेव तंत्रज्ञान विकसित केले आहे. समाजासाठी अतिशय उपयुक्त असे हे तंत्रज्ञान आहे. मात्र जंतुसंसर्गाबाबत अद्यापही समाज आणि प्रशासनात पुरेशी जागृती नाही. ती झाल्यास कचरा जाळून होणारा जंतुसंसर्ग टाळता येईल, असे डॉ. भरत बल्लाळ यांनी व्यक्त केले.

    काय आहे संशाेधन ?

    जैविक कचरा जाळताना जंतू विसर्ग होऊन त्या परिसरातील लोकांना गंभीर आजार होतात. ही बाब लक्षात घेऊन जंतुसंसर्गाचा शास्त्रीय अभ्यास करून भविष्यात लोकांच्या आरोग्यास अपाय होऊ नये यासाठीचे तंत्रज्ञान बल्लाळ दाम्पत्याने विकसित केले. त्यांच्या या तंत्रज्ञानामुळे जंतुविसर्ग न करता कचरा जाळला जातो. त्यांच्या या संशोधनाला एकस्व अधिकारही प्राप्त झाले आहेत.