पोलीस आयुक्तांचा पुण्यानंतर औरंगाबादच्या ‘भाई’ला मोक्काचा दणका..!

पोलीस आयुक्तांनी पुण्यातील गुन्हेगारांना मोक्काची जरब बसविल्यानंतर आता औरंगाबादमधील एका गुंडाला मोक्काचा दणका दिला आहे. स्वयंघोषित भाईचा कोंढव्यात देखील राडा असत. त्याची टोळी असल्याने कोंढवामधील त्याच्या साथीदारांवर आणि त्याच्यावर कारवाई केली आहे.

    पुणे : पोलीस आयुक्तांनी पुण्यातील गुन्हेगारांना मोक्काची जरब बसविल्यानंतर आता औरंगाबादमधील एका गुंडाला मोक्काचा दणका दिला आहे. स्वयंघोषित भाईचा कोंढव्यात देखील राडा असत. त्याची टोळी असल्याने कोंढवामधील त्याच्या साथीदारांवर आणि त्याच्यावर कारवाई केली आहे. आयुक्तांच्या मोक्का कारवाईने गुन्हेगारांचा थरकाप उडाला असल्याचे यावरून दिसत आहे.

    जाहेद गणी शेख उर्फ लंगडा (वय २५, रा. गल्ली क्रमांक ८), वसिम उर्फ लाला रशिद हजारी (वय ३८), सोहेल ईनामुल शेख (वय २३), रूहान खैरूद्दीन तांचारम्बण (वय १९), वाहिद उर्फ शाहरूख रियाज बागवान (वय २६), अजय राजकुमार ढगे उर्फ गोपी (वय २२), मोसीन मोहम्मद रफी कुरेशी (वय ३०), अझहर रहिमोद्दीन शेख उर्फ बांगा (वय २६) आणि त्यांचा १७ वर्षीय साथीदार अशांवर कारवाई करण्यात आली आहे.

    जाहेद गणी शेख उर्फ लंगडा हा टोळीप्रमुख आहे. तो मुळचा औरंगाबादचा असून, त्याची कोंढव्यात टोळी कार्यरत होती. या साथीदारांना घेऊन तो परिसरात दहशत माजवित होता. या टोळीवर औरंगाबाद, नांदेड तसेच शहरातील वानवडी, कोंढवा, कोरेगांव पार्क, खडक या पोलीस ठाण्यात एकूण २० गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर शरिराविरूद्धचे आणि मालमत्ताविरूद्धचे गुन्हे दाखल आहेत. यात खून, खूनाचा प्रयत्न, लोकांना दमदाटी करणे यासह गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.

    नुकताच त्यांच्यावर कोंढव्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यांच्या सततच्या गुन्हेगारी कारवायामुळे परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे वरिष्ठ निरीक्षक सरदार पाटील यांनी या टोळीवर मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव परिमंडळ पाचच्या उपायुक्त नम्रता पाटील यांच्यामार्फत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावाची पडताळणीकरून पोलीस आयुक्तांनी या टोळीवर मोक्का कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांची ही ७१ वी मोक्का कारवाई ठरली आहे.