पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा संपन्न

    पुणे : बाणेर येथील सिध्दीविनायक मित्र मंडळ व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धेत डॉ. पतंगराव कदम संघ, श्रीकृष्ण संघ,  सतेज बाणेर अ संघ, एम.एच.स्पोर्ट्स संघाने विविध गटांत विजेतेपद पटकावले.

    डॉ. पतंगराव कदम संघाची कामगिरी

    किशोरी गटात डॉ. पतंगराव कदम संघाने एम.एच. स्पोर्टस् संघावर ४०-२२ अशी मात करीत जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचे विजेते पद पटकावले. मध्यंतराला डॉ.पतंगराव कदम संघाकडे २२-७ अशी आघाडी होती. डॉ. पतंगराव कदम संघाच्या श्रतिका भामे, आर्या लवार्डे, रिया लवार्डे  व आलिया सय्यद यांनी जोरदार खेळ करीत आपल्या संघावला विजय मिळवून दिला. एम.एच. स्पोर्टस् संघाच्या रिना कुदळे, एकता ननावरे, धनश्री ननावरे यांनी चांगला खेळ केला.

    श्रीकृष्ण संघाची कामगिरी

    किशोर गटाच्या अंतिम सामन्यात  श्रीकृष्ण संघाने धर्मवीर कबड्डी संघावर ४९-४२ अशी मात करीत अंतिम विजेते पद पटकाविले. मध्यंतराला दोन्ही संघ २६-२६ अशा समान गुणांवर होता.

    अंतिम सामन्यात सतेज बाणेर अ संघाची कामगिरी

    श्रीकृष्ण संघाच्या अमित कांबळे, विशाल घाघरमाळे व धनंजय कापसे यांनी चौफर हल्ला चढवित आपल्या संघाला विजय मिळवून दिला. धर्मवीर संघाच्या आर्य़न पोलकर, रोनक कांबळे व लाड यांनी चांगला प्रतिकार केला. मात्र, त्यांना विजयापासुन दूर राहावे लागले.
    पुरुष विभागाच्या  अंतिम सामन्यात सतेज बाणेर अ संघाने प्रकाशतात्या बालवडकर यासंघावर ५०-२२ असा विजय मिळवित  अजिंक्यपद पटकावले.

    मध्यंतराला सतेज बाणेर अ संघाकडे २२-१२ अशी आघाडी होती. सतेज संघाच्या अक्षय जाधव, सुनिल दुबिले, सचिन पाटील यांनी चौफेर चढाया करीत आपल्या संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली. त्यांना किरण मगर व मनोज बोंद्रे यांनी उत्कृष्ट पकडी घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. प्रकाशतात्या बालवडकर संघाच्या बबलु गिरी व कृष्णा जगताप यांनी खोलवर चढाया केल्या तर किरण गंगणे व भाऊसाहेब गोजने यांनी सुरेख पकडी घेतल्या.   महिला विभागाच्या अंतिम सामन्यात अत्यंत अटितटीच्या लढतीत  एम.एच.स्पोर्ट्स संघाने द्रोणा स्पोर्टस् संघावर २८-२५ गुणांनी विजय मिळवून स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.

    शेवटच्या चढाईपर्य़ंत या सामन्यात रंगत भरली होती. हा सामना निर्धारित वेळेत १९-१९ अशा समान गुणांवर संपला. त्यानंतर हा सामना पाच पाच चढाया देऊन खेळविण्यात आला. यामध्ये एम.एच. स्पोर्टस् संघाच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ करीत संघाला २८-२५ असा विजय मिळवून दिला. मध्यंतराला एम.एच. स्पोर्टस्  संघाकडे १०-८ अशी आघाडी होती. एम.एच.स्पोर्टस् संघाच्या प्रतिक्षा् करेकर, अंकिता मोहोळ यांनी जोशपुर्ण खेळ करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

    तर स्वप्नाली पासलकर हिने सुरेख पकडी घेतल्या. द्रोणा स्पोर्ट्स संघाच्या श्वेता माने, अपेक्षा किरवे, ऋतिका व्यवहारे यांनी चौफेर चढाया केल्या. तर भूमिका यादव हिने चांगल्या पकडी घेतल्या.