
पुणे : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि सिद्धिविनायक मित्र मंडळ, बाणेर यांच्या वतीने ३४वी किशोर/किशोरी गट व ७१वी वरिष्ठ गट (पुरुष/महिला) पुणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ३० सप्टेंबरपासून सुरू होणार्या या स्पर्धेतील पिंपरी-चिंचवड शहर, पुणे शहर व पुणे ग्रामीण असे तीन संंघ राज्य अजिंक्यपद स्पर्धेत खेळणार आहेत.
पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह बाबूराव चांदेरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष दत्तात्रय कळमकर, सरकार्यवाह दत्तात्रय झिंजुर्डे, कोषाध्यक्ष प्रकाश पवार, सहकार्यवाह राजेश ढमढेरे, उपाध्यक्षा शकुंतला खटावकर, वासंती सातव, संगीता कोकाटे, अर्जुन शिंदे, नसीर सय्यद, संजय ताम्हाणे, विशाल विधाते, शेखर सायकर आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा
बाबूराव चांदेरे पुढे म्हणाले, पूर्वी पुणे जिल्ह्याचा एकच संघ खेळत होता. त्यामध्ये फक्त ७२ खेळाडूंनाच खेळण्याची संधी मिळत होती. मात्र, अजित पवार यांच्या माध्यमातून आता महाराष्ट्रातील ‘अ’ व ‘ब’ दर्जाच्या महानगरपालिकेच्या हद्दीतील खेळाडूंना राज्य अजिंक्यपद निवड चाचणी खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील तीन संघांना (२१६ खेळाडू) राज्य अजिंक्यपद स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे पुणे विभागाच्या तीन गटांतील जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धा शनिवारपासून (दि.३०) सुरू होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहर गटाची स्पर्धा
पुणे शहर गटाची स्पर्धा सिद्धिविनायक मित्र मंडळ, बाणेर यांच्या वतीने वै. सोपानराव कटके म.न.पा. शाळा, बाणेर येथे ३० सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. पुणे ग्रामीण गटाची स्पर्धा नवतरुण क्रीडा मंडळ, सासवड यांच्या वतीने सासवड येथे ५ ते १० ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. याचबरोबर पिंपरी-चिंचवड शहर गटाची स्पर्धा भैरवनाथ क्रीडा संस्था, भोसरी यांच्या वतीने रावजी लांडगे कुस्ती संकुल, भोसरी येथे १० ते १५ ऑक्टोबरदरम्यान होणार आहे.