पुणे जिल्हा हादरला; जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या धरणात ९ जण बुडाले, ५ महिलांचा समावेश

जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या धरणात आज पोहण्याचा आनंद घेण्यास गेलेले ९ जण बुडालयाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत चार विद्यार्थ्यांसह पाच महिलांचा समावेश आहे. या घटनेने पुण्यासह जिल्हा हादरून गेला असून, सर्वत्र शोककळा पसरली आहे.

    पुणे : जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या धरणात आज पोहण्याचा आनंद घेण्यास गेलेले ९ जण बुडालयाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत चार विद्यार्थ्यांसह पाच महिलांचा समावेश आहे. या घटनेने पुण्यासह जिल्हा हादरून गेला असून, सर्वत्र शोककळा पसरली आहे. यात चासकमान धरणात पोहण्यास गेलेले चार विद्यार्थी बुडाले असून, भाटघर धरणात ५ महिला बुडाल्या आहेत.

    जिल्ह्यातील खेड तालुक्यात गुंडाळवाडी गावात चासकमान धरण आहे. या धरणात चार विद्यार्थी पोहण्यास उतरले होते. गुंजाळवाडी गावातील तिवळी हिल येथील सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलचे हे चारही विद्यार्थी असल्याचे समजते. निवासी असलेल्या या विद्यार्थ्यांना उद्या पासून सुट्टी लागणार होती. त्यामुळे शाळेतील ३४ विद्यार्थी शिक्षकांसह पोहण्यासाठी चासकमान धरणाच्या जलाशयात गेले होते. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली आहे.

    पाण्यात हे सर्व विद्यार्थी उभे असताना एक मोठी लाट आली आणि सहा ते सात विद्यार्थी पाण्यात ओढले गेले. या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. काही विद्यार्थ्यांना पाण्याच्या बाहेर काढले. मात्र चार विद्यार्थी पाण्यात बुडाले.

    तनिषा देसाई, रीतीन डीडी, परिक्षित अग्रवाल आणि नव्या भोसले अशी बुडालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर पुण्याजवळील भाटघर धरणात पाच विवाहित महिलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून, सायंकाळी ही घटना घडली आहे. त्यातील एक मुलगी सुदैवाने बचावली आहे.

    धरणाच्या जलाशयात पाच ते सहा महिला बुडाल्याची माहिती स्थानिक नागरिकांना मिळाली होती. स्थानिक नागरिकांनी यातील तीन महिलांचे मृतदेह बाहेर काढले होते. तर घटनास्थळी दाखल झालेल्या प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील आणि राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या सह्याद्री सर्च अँड रेसकोर्स जवानांनी शोधकार्य सुरू केले. याघटनेत खुशबू लंकेश राजपूत, मनीषा लखन रजपुत, चांदनी शक्ती राजपूत, पुनम संदीप राजपूत आणि मोनिका रोहित चव्हाण अशी बुडालेल्या महिलांची नावे आहेत.