पुण्यातील ड्रग्ज प्रकरण हे गृह खात्याचे अपयश; आमदार रवींद्र धंगेकर यांचा आरोप

पुण्याचा आसपास चार हजार कोटींचे ड्रग्स सापडणे म्हणजे पोलिसांचे, गुप्तचर यंत्रणांचे आणि गृह खात्याचे अपयशच आहे, असा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.

  पुणे : पुण्याचा आसपास चार हजार कोटींचे ड्रग्स सापडणे म्हणजे पोलिसांचे, गुप्तचर यंत्रणांचे आणि गृह खात्याचे अपयशच आहे, असा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात साठा निर्माण झालाच कसा? तो एका रात्रीत तर निर्माण झाला नाही? एका दिवसात अमली पदार्थाचे कारखाने इथे उभे राहिले नाहीत. गुप्तचर यंत्रणांना याची माहिती आधीच का समजली नाही, असे अनेक प्रश्न धंगेकर यांनी उपस्थित केले. या प्रकरणात ठराविक पोलिसांची हप्तेखोरी सुरू होती, असा संशय येतो, असेही ते म्हणाले.

  पुण्यात ललित पाटील ड्रग्ज प्रकरण घडल्यानंतर आता पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पुण्यात ड्रग्ज आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार धंगेकर यांनी गुरुवारी (दि. २२) पत्रकार परिषद घेऊन सरकार समोर अनेक प्रश्न उपस्थित केले. सरकार सध्या आमदार फोडाफोडीत आणि सत्तेच्या राजकारणात व्यस्त आहे तर गुप्तचर यंत्रणा गायबच आहे. त्यामुळे सरकारने अद्याप पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावर कसलेही भाष्य केले नाही, असे ते म्हणाले.

  धंगेकर म्हणाले, ‘मी गेले वर्षभर ओरडून ओरडून सांगत आहे, पोलिसांना भेटून, त्यांना पत्र देवून सांगत आहे की पुण्यात ड्रग्जचे मोठे रॅकेट आहे. पोलिसांची आता होत असलेली कारवाई म्हणजे माझा वर्षभरापासूनचा संशय खरा ठरला असेच म्हणावे लागेल. पोलिसांनी त्याचवेळी कारवाई का केली नाही?, असा प्रश्न पोलिसांना आणि गृह खात्याला मला विचारायचा आहे, असेही ते म्हणाले.

  पुणे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे शहर आहे. हे लोकमान्य टिळकांचे पुणे आहे. सावित्रीबाईंची नगरी आहे. अशी ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या पुण्यात अमली पदार्थांचे कारखाने उभे राहत असतील आणि या पुण्यनगरीतून राज्यात, राज्याबाहेर आणि देशाबाहेर अमली पदार्थ पाठवले जात असतील तर हे फारच चिंताजनक आहे. पुण्याच्या लौकिकाला छेद देणाऱ्या या घटना आहेत, असे धंगेकर यांनी सांगितले.

  पोलिसांना सरकारने सहकार्य करावे

  ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाचा तपास सरकारने पूर्ण केला नाही. तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना पाठीशी घातले. कुठलीही कारवाई त्यांच्यावर केली नाही. या खात्याचे मंत्री हसन मुश्रीफ आणि सरकार त्यांना वाचवत आहे. त्यांना अटक करण्याची परवानगी देऊन काम करणाऱ्या पोलिसांना सरकारने सहकार्य करावे, अशी माझी पुन्हा एकदा सरकारकडे मागणी आहे, असे धंगेकर यांनी सांगितले.

  फडणवीसांविरोधातही मी जिंकेन

  आगामी लाेकसभा निवडणुकीत मला पक्षाने संधी दिली तर मी नक्कीच निवडणूक लढवेन. भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा आणखी वरीष्ठ नेत्याला उमेदवारी दिली तरी मीच विजयी हाेईन, असा दावा काॅंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.

  लाेकसभेची निवडणूक जाहीर हाेण्यापुर्वीच पुण्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. आमदार धंगेकर यांनी विजय आपला हाेईल असा दावा करीत सत्ताधारी भाजपला खुले आव्हान दिले आहे. ते म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीसाठी माझ्या नावाची चर्चा सुरू आहे. काँग्रेस पक्षाने मला निवडणूक लढवण्याची संधी दिली तर मी नक्की लढेन आणि जिंकेन. पुणे लोकसभेची जागा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या वरिष्ठांनी लढवली तरी मीच जिंकेन. ’’