Pune is the second safest city in the country, NCRB report released, Kolkata is the first
Pune is the second safest city in the country, NCRB report released, Kolkata is the first

  पुणे : देशाची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी असलेले पुणे देशभरात सुरक्षेबाबत दुसऱ्या क्रमांकाच शहर ठरले आहे. तर, कोलकता हे देशात सर्वांत सुरक्षित शहर ठरले असून, सलग तीन वर्षे कोलकताने प्रथम क्रमांक मिळवत ‘हॅट्‌ट्रिक’देखील साधली आहे. दरम्यान, पुणे पोलिसांचे प्रयत्न यशस्वी होत असल्याचेही यावरून दिसत आहे.

  दरवर्षी होतो अहवाल प्रसिद्ध

  राष्ट्रीय गुन्हा नोंद विभागाने (एनसीआरबी) नुकताच ‘भारतातील गुन्हेगारी २०२२’ हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालात ही बाब समोर आली आहे. अहवालानुसार एनसीआरबीने २६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश तसेच केंद्रीय संस्थांकडून गोळा करण्यात आलेल्या माहितीवर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. दरवर्षी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात येतो.

  या माहितीच्या आधारे होतो अहवाल सादर

  लोकसंख्या व दाखल होणारे गुन्हे तसेच इतर गोष्टींच्या माहितीवर हा अहवाल सादर होतो. भारतीय दंडसंहिता (आयपीसी), विशेष आणि स्थानिक कायदे (एसएलएल) याअंतर्गत नोंदविले जाणारे गुन्हे हे दखलपात्र समजले जातात. अहवालानुसार, महानगरांत प्रति लाख लोकसंख्येमागे दखलपात्र गुन्ह्यांची सर्वांत कमी नोंद पुन्हा एकदा कोलकत्ता शहरात झाली आहे.

  अशी आकडेवारीनुसार दखलपात्र गुन्हे दाखल

  कोलकाता येथे प्रतिलाख लोकसंख्येत दखलपात्र गुन्हे हे ८६.७ इतके नोंदविले गेले आहेत. पुण्यात हेच प्रमाण २८०.७ इतके आहे. त्याखालोखाल तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या हैदराबादमध्ये २९९.२ असे आहे.

  मोक्का व एमपीडीएसारख्या कारवाईने वचक आणण्याचा प्रयत्न

  पुणे पोलिसांकडून गेल्या काही वर्षांत मोक्का तसेच एमपीडीएसारख्या कारवाई करून गुन्हेगारांवर वचक बसविण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासून तब्बल ९३ टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे. तर, एमपीडीएनुसार ६० गुंड कारागृहात स्थानबद्ध केले आहेत. यासोबत शहरातील बाल गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिसांनी “परिवर्तन” हा उपक्रम राबवत त्यांना गुन्हेगारीतून बाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे.

  ‘एनसीआरबी’च्या अहवालानुसार २०२१ आणि २०२३ मधील दखलपात्र गुन्हे (एक लाख लोकसंख्येमागे)
  कोलकता : १०३.४- ८६.७
  पुणे : २५६.८ – २८०.७
  हैदराबाद : २५९.९ -२९९.२

  पुणे पोलीस आणि पुणेकरांसाठी आनंदाची बाब

  पुणे पोलीस व पुणेकरांसाठी ही आनंदाची बाब आहे. गुन्हेगारी आणखी कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. परंतु, यासोबतच गुन्हेगारीतील मुलांना बाहेर काढण्यासाठी देखील आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. पुढील काळात पुणे आणखी सुरक्षित शहर म्हणून कसे राहिल, यासाठी प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया  रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी दिली आहे.