पुणे करांच्या वाहतुकीत बदल, जाणून घ्या नक्की कोणते बदल झाले?

समृद्ध इतिहास असलेल्या गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात होत असून उत्सवादरम्यान शहर आणि उपनगरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

    पुणे : आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र जल्लोषाचे वातावरण असणार आहे. आज गणरायाचे आगमन होणार आहे त्यामुळे जागोजागो गर्दी पाहायला मिळेल. पुण्यातील मुख्य रस्त्यांवरुन मिरवणुका निघणार आहेत. त्यामुळे नागरिकांना कोणताही नाहक त्रास होऊ नये आणि गणरायाला घरी नेण्यासाठी वाहतूक कोंडींचा सामना करावा लागू नये, यासाठी पुण्यातील मध्यवर्ती भागातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी या मार्गाचा वापर करावा, असं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे.गणेशोत्सवादरम्यान शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 7 हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.

    पुणे पोलिसांनी संभाव्य दहशतवादी हल्ले आणि अनपेक्षित घटना लक्षात घेऊन बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. समृद्ध इतिहास असलेल्या गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात होत असून उत्सवादरम्यान शहर आणि उपनगरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. उत्सवादरम्यान, राज्य आणि देशाच्या इतर भागातून अनेक पर्यटक शहराला भेट देतात. शहराच्या मध्यवर्ती भागातील गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. मोबाईल, दागिने चोरीच्या घटना रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.

    पुण्यामधील हे रस्ते बंद राहतील
    – शिवाजीनगर येथून शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून (मॉडर्न कॅफे चौक), जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक रस्त्याने इच्छितस्थळी जावे.
    – झाशी राणी चौक ते खुडे चौक, डेंगळे पूल मार्गे कुंभारवेस जाणाऱ्या वाहन चालकांनी खुडे चौकातून मनपा पुणे समोरून मंगला चित्रपट गल्लीतून कुंभार वेस किंवा प्रिमियर गॅरेज चौक शिवाजी पुल मार्गे, गाडगीळ पुतळा चौक, डावीकडे वळून कुंभार वेस चौक.
    – गाडगीळ पुतळा चौकातून डावीकडे वळून कुंभारवेस चौक, शाहीर अमर शेख चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.
    – मुंढव्यातील केशवनगर भागात मूर्ती खरेदीसाठी होणारी गर्दी विचारात घेऊन या भागात वाहतूक बदल करण्यात आला आहे.
    – सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर (सिंहगड रस्ता) परिसरात मूर्ती विक्रेत्यांनी तात्पुरती दुकाने थाटली आहेत. या भागात वाहनचालकांनी वाहने लावू नयेत.

    वाहतुकीस खुले रस्ते
    – फडके हौद चौक ते जिजामाता चौक ते फुटका बुरूज चौक
    – आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक ते मोती चौक
    – सोन्यामारुती चौक ते बेलबाग चौक ते सेवासदन चौक
    – मंगला चित्रपटगृहसमोरील प्रिमिअर गॅरेज गल्ली ते कुंभार वेस