पुणे म्हाडाच्या घरांच्या सोडतीला अखेर मिळाला मुहूर्त; ‘या’ तारखेला निघणार साेडत

पुणे मंडळाने सोडतीची नवी तारीख जाहीर केली असून ५ डिसेंबरला पुण्यात सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीत अंदाजे ५९ हजार अर्जदार सहभागी होणार आहेत.

    पुणे : म्हाडाच्या पुणे मंडळाच्या पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत उभारलेल्या ५८६३ घरांच्या विक्रीसाठी २४ नोव्हेंबर रोजी संगणकीय सोडत काढण्यात येणार होती. मात्र ही सोडत प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती. अखेर आता पुणे मंडळाने सोडतीची नवी तारीख जाहीर केली असून ५ डिसेंबरला पुण्यात सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीत अंदाजे ५९ हजार अर्जदार सहभागी होणार आहेत.

    पुणे मंडळ क्षेत्रातील ५८६३ घरांच्या सोडतीच्या अर्जविक्री-स्वीकृतीला इच्छुकांनी बऱ्यापैकी प्रतिसाद दिला आहे. अर्जविक्री-स्वीकृतीच्या अंतिम मुदतीत ६० हजार अर्ज दाखल झाले आहेत. यातील अंदाजे ५९ अर्जदार पात्र ठरले आहेत.

    आता ५ डिसेंबर रोजी सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी दिली. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ही सोडत काढण्याचे नियोजन असून, यासाठी अजित पवार यांची वेळ घेण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.