
पुणे : पुणे महापालिकेचे आराेग्य विभाग प्रमुख डाॅ. भगवान पवार यांच्यासह जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांची मंगळवारी सांयकाळी बदली केली गेली. सहा महिन्यांच्या आत या दाेन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. डॉ. रामचंद्र हंकारे यांनी पाच महिन्यांपूर्वी डॉ. भगवान पवार यांच्याकडून जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांचा पदभार स्वीकारला होता.
मुंबई औद्योगिक आरोग्य विभागात सहायक म्हणून बदली
त्याचप्रमाणे डॉ. भगवान पवार यांनीही त्याच कालावधीत महापालिका वैद्यकीय अधिकारी म्हणून सूत्रे स्वीकारली होती. आता हंकारे यांची मुंबई येथे औद्योगिक आरोग्य विभागात सहायक संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. तर डॉ. पवार यांची आरोग्य सेवेच्या अंधत्व नियंत्रण कार्यक्रम येथे आरोग्य सहायक संचालकपदी बदली झाली आहे. पुण्यातील दोनही प्रमुख अधिकाऱ्यांची मुंबई येथे बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
महापालिका वर्तुळात उलट सुलट चर्चा
नुकतेच पुणे महापािलकेच्या अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय शिक्षण महाविद्यालयात प्रवेशाकरीता लाच घेतल्या प्रकरणी अधिष्ठातांना अटक झाली हाेती. या प्रकरणी चाैकशी सुरु असुन, याचवेळी डाॅ. भगवान पवार यांची बदली झाल्याने महापालिका वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु झाली अाहे.
तत्काळ कार्यमुक्त करण्यात यावे
याबाबतचा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने मंगळवारी सांयकाळी जारी केला. या अधिकाऱ्यांना नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी हजर होण्यासाठी तत्काळ कार्यमुक्त करण्यात यावे आणि संबंधित अधिकाऱ्याने त्यांना दिलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी त्वरित हजर होऊन, त्याबाबतचा अहवाल आरोग्य विभाग, मुंबई यांना सादर करावा, असेही राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.