पुण्याला पाच हजार सीसीटीव्हींची गरज : अमिताभ गुप्ता

"कॉफी विथ नवराष्ट्र" या विशेष संवादात पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरातील गुन्हेगारी तसेच पोलिसींग व त्यांनी केलेल्या कामगिरीबाबत माहिती दिली. गुप्ता यांना २० सप्टेंबर २०२२ रोजी पुण्याचा पदभार स्विकारून दोन वर्ष पुर्ण झाली.

  • पुण्याला पाच हजार सीसीटीव्हींची गरज..!
  • अडीच हजार सीसीटीव्हींचा प्रस्ताव सादर
  • 'कॉफी विथ नवराष्ट्र' चर्चेत पोलीस आयुक्तांशी मनमोकळ्या गप्पा

पुणे : देशात सीसीटीव्हींनी कैद असणारे पुणे पहिले शहर आहे. शासनाने शहरात १ हजार ३०० सीसीटीव्ही बसविले. त्यापैकी ३०० सीसीटीव्ही हे पिंपरी-चिंचवड शहरात आहेत. सर्व विचार केल्यास आज पुण्याला पाच हजार सीसीटीव्हींची गरज आहे. आम्ही शासनाला अडीच हजार सीसीटीव्ही बसविण्याचा प्रस्ताव सादर केला आहे, असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. पुण्याचा मोठा विस्तार झाला आहे. त्याचा विचार केल्यास प्रत्येक भाग व गल्ली बोळात सीसीटीव्हीच्या निगरानीखाली आणायचा असेल तर ५ हजार सीसीटीव्हींची गरज आहे, असेही ते म्हणाले. ‘कॉफी विथ नवराष्ट्र’ या विशेष संवादात पोलीस आयुक्तांनी शहरातील गुन्हेगारी, पोलिसींग व त्यांनी केलेल्या कामगिरीवर भूमिका मांडली.

पहा पूर्ण मुलाखत

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना २० सप्टेंबर २०२२ पुण्याचा पदभार स्विकारून दोन वर्ष पूर्ण झाली. गुप्ता म्हणाले, मी पदभार स्विकारला तेव्हा कोरोनाचा हाहाकार होता. ते आमच्यापुढे पहिले आव्हान होते. त्या काळात पोलिसांनी उत्तम काम केले. आज दैनंदिन जनजीवन सुरळीत सुरू झाले आहे. ते आमच्यासाठी महत्वाचे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारागृहातून बाहेर आलेल्यांमुळे गुन्हेगारीत वाढ झाल्याचे दिसत होते. त्यांच्याकडून चौकात वाढदिवस साजरे केले जात. त्या पार्ट्यांमध्ये तलवारी व कोयत्याने केक कापले जात. त्याचे व्हिडीओ स्टेट्स व सोशल मीडियावर टाकले जात होते. वाहन तोडफोड व जाळपोळीच्या घटना घडत होत्या. दहशतीसाठी ते केले जात होते. या गुन्ह्यांना पुर्ण आळा घालण्यात यशस्वी झालो, असे म्हणता येईल. आता गुन्हेगाराच असे काही करण्यास धजावत नाही.

जाळपोळ व तोडफोडीचे सत्र देखील थांबले आहे आणि स्टेट्स प्रकरण देखील होत नसल्याचे दिसत आहे. रस्त्यांवरच्या गुन्हेगारी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर गुप्ता म्हणाले, वाहन चोरीच्या घटना वाढल्या आहेत. परंतु, इतर गुन्ह्यात मोठी घट आहे. काही प्रकरणात आमचे काम सुरू आहे. त्यालाही लवकरच आळा घातला जाईल. शहराला आणखी सीसीटीव्हींची गरज आहे. आम्ही गरज असणाऱ्या अशा ठिकाणांची पाहणी केली आहे. त्यात अडीच हजार सीसीटीव्हींचा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे. स्ट्रीट क्राईमला लगाम लावण्यात सीसीटीव्हींचा सर्वाधिक उपयोग होत आहे.

पाच परिक्षांचा घोटाळा उघडकीस

पुणे पोलिसांनी राज्यातील पाच परिक्षांचा घोटाळा उघडकीस आणून कारवाई तर केलीच पण, देशात नाव देखील उंचावले. पुणे विद्येचे माहेरघर आहे. याठिकाणी स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहेत. एका मुलाच्या माहितीवरून एक कारवाई केली आणि त्यानंतर पाच प्रकरण बाहेर आली. त्यात ४० हून अधिक जणांना अटक देखील केली. त्यासोबतच हे रॅकेट उद्वस्त करण्यात यशस्वी झाले, असे गुप्ता यांनी सांगितले.

महिला सुरक्षेला पहिले प्राधान्य

देशात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असतो. आम्ही महिला सुरक्षेला पहिले प्राधान्य दिले आहे. एक घटना शहरात घडल्यानंतर रिक्षा चालक व प्रवासी वाहतूक करणाऱ्यांची झाडाझडती घेतली. त्याला एक सिस्टीम बसविली. पालिका व संबंधित यंत्रेणेसोबत बैठका घेऊन धोरण ठरविले. महिलांची सुरक्षा हे आमच्यासाठी कधीही पहिले प्राधान्य असेल, असे गुप्ता यांनी सांगितले.

वाहतूक प्रश्न गंभीर

वाहतूक पोलिसांच्या कारवाईला ब्रेक दिला व काही दिवसांनी कारवाई पुन्हा सुरू झाली. वाहतूक नियमनापेक्षा ते केस करण्यावर लक्ष देतात, अशी तक्रार होती. त्यामुळे तो ब्रेक दिला होता. त्यानंतर काही बदल केले. दिवसासोबतच आता नाईटला देखील वाहतूक नियमन सुरू केले. स्वत: याबाबत शहराचा सर्व्हे केला. आवश्यक बदल केले. ठराविक काळ फक्त वाहतूक नियमनच केले जाईल. त्यानंतर केसेसकडे लक्ष दिले जाईल, वाहतूक हा प्रश्न गंभीर आहे. पण, त्यावर उपाय काढले जात आहेत. हळूहळू पुण्याची वाहतूक देखील कमी होईल, असे गुप्ता म्हणाले.

सायबर क्राईम एक समस्या

सायबर क्राईम देखील पुर्वी घडत असणाऱ्या गुन्ह्यांचा विचार केल्यास त्या सारखाच आहे. पुर्वी धन देतो किंवा कुठे तरी वाटप सुरू आहे म्हणून फसविले जात होते. सायबर गुन्हेगारी देखील त्याप्रमाणेच आहे. नागरिकांना एका घेऱ्यात घेतले जाते. त्यांचे लक्ष विचलीत केले जाते. त्यांना आमिष दाखविले जाते. लोन अॅपच्या माध्यमातून सध्या नागरिक फसविले जात आहे. हे सावकारीपेक्षाही भयंकर आहे. त्याला बळी पडू नका. न कळत त्या ट्रॅपमध्ये आलाच असाल तर घाबरून जाऊ नका. फोटो मार्फ करून ते तुम्हाला घाबरवतात. पण, त्याला बळी पडून नका. लवकरच या लोन अॅपला आळा बसलेला असेल. त्यावर सायबर पोलीस काम करत असून, लवकरच त्याची माहिती दिली जाईल, असे गुप्ता यांनी सांगितले.

पासपोर्ट व्हिरिफिकेशन पेंडसी झीरो

  • पासपोर्ट व्हिरीफिकेशनबाबत पोलीस आयुक्त म्हणाले, पेंडसी झीरो आहे. आम्ही ७ दिवसांच्या वर एकही पेंटसी राहत नाही. काही महिन्यांपुर्वी तीन ते चार दिवसांत व्हिरीफिकेशन होत होते.
  • दहा ते बारा वर्षांपासून सुरू असणाऱ्या अवैध सावकारीला लगाम लावण्यात यशस्वी झालो आहोत. नागरिकांसाठी एक व्हॉट्सअप क्रमांक दिला. त्यावर तक्रारी आल्यानंतर त्याची चौकशीकरून लागलीच कारवाई केली जाते. त्यामुळे या जाचातून नागरिकांची सुटका होत आहे.
  • पुणे पोलिसांच्या केलेल्या उत्तम कामगिरीमुळे पुण्याला बेस्ट पोलीस युनिट म्हणून पारितोषिक मिळाले आहे.
  • राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला असून, त्यात पुणे सेफ सिटी म्हणून देशात दुसऱ्या स्थानावर आहे. महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. त्याचे श्रेय आपसूकच पुणे पोलिसांनी केलेल्या उपाययोजना व कामाला जाते.
  • सायबर पोलिसांनी दोन ते तीन केसेस मोठ्या केल्या असून, त्यामुळे देशात पुणे सायबर पोलिसांचे नाव उंचावले आहे. त्यासाठी आम्ही सायबर पोलीस सतत अपडेट करत राहिलो. मुलाखत घेऊन व इच्छुक असणाऱ्या कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची नियुक्ती करतो. तर, कामाची देखील एक आखणी केली आहे.