
पुणे : पुणे पोलिसांनी आधुनिकतेची कास धरत आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली असून, आर्टिफिशल इंटेलिजन्सवर आधारित ‘फेस रिकग्नायजेशन’ यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग शहरात राबवला जाणार आहे. त्याद्वारे शहर, राज्यासह देशभरात वॉन्टेड असलेल्या आरोपींना या फेस रिकग्नायजेशनमुळे ओळखले जाणार आहे. शहरात अशाप्रकारचे अत्याधुनिक असे २ हजार ८८० कॅमेरे बसविले आहे.
मुंबईनंतर सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर
मुंबईनंतर सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर म्हणून पुण्याला ओळखले जाते. परंतु, पुण्यात यासोबतच गुन्हेगारीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दहशतवादद्याच्या टार्गेटवर देखील शहर असल्याचे दिसून आले आहे. वाढती लोकसंख्या आणि पोलिसांची मनुष्यबळ यात मोठा फरक आहे. काळानुरूप गुन्हेगार देखील हाय टेक व उशार झाले असल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण होत आहे.
“फेस रिकगनायजेशन”‘ यंत्रणा कार्यान्वित
गुन्हेगार या शहरात गुन्हा करून दुसऱ्या शहरात वास्तव्य करतात. त्यामुळे वर्षानुवर्षे आरोपी मिळून येत नाही. या पार्श्वभूमीवर आता पोलिसांकडून देखील अत्याधुनिक यंत्रणेचा आधार घेत आरोपींचा माग काढला जात आहे. याचाच एक भाग म्हणून आता “फेस रिकगनायजेशन”‘ यंत्रणा हा उपक्रम शहरात राबवला जाणार आहे. अत्याधुनिक टेक्नोलॉजी असलेले तबल 2880 कॅमेरे शहरात बसवले जाणार आहेत. विशेषतः शहरातील गर्दीच्या ठिकाणी म्हणजेच एसटी स्टँड, रेल्वे स्थानक परिसर आदी ठिकाणी याप्रकारचे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
काय आहे उपक्रम
फेस रिकगनायजेशनचे काम या अत्याधुनिक सीसीटीव्हीद्वारे चालवले जाणार आहे. यामध्ये राज्य तसेच देशभरातील गुन्हेगार, दहशतवादी व मोस्ट वॉन्टेड अश्या गुन्हेगारांचा डाटा समाविष्ट केला जाणार आहे. त्याद्वारे कॅमेरे त्यांचा चेहरा कैद होताच कंट्रोल रूमला कळणार (सिग्नल). त्यानंतर लागलीच त्याला पकडू शकतील.
गुन्हेगाराचा अभिलेख पाहणे सोपे
सीसीटीएनएस म्हणजेच क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीममध्ये गुन्हेगारांची कुंडली उपलब्ध असते. पोलिस प्रक्रियेचे संगणकीकरण, गुन्हे आणि गुन्हेगारी नोंदींच्या डेटाबेसवर संपूर्ण देशात शोध घेण्यास मदत करणे, राज्य आणि केंद्रात गुन्हे व गुन्हेगारी अहवाल तयार करणे आदींसाठी सीसीटीएनएस महत्वाचे ठरते. यामध्यमातून गुन्हेगाराचा अभिलेख पाहणे सोपे जाते. ही यंत्रणा या प्रक्रियेत पोलिसांना फायदेशीर ठरणार आहे.