
मुंबईतील मुलुंड भागात बोगस कॉल सेंटर सुरू करून त्याद्वारे राज्यभरातील नागरिकांना कर्जाच्या आमिषाने लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दत्तवाडी पोलिसांच्या सायबर पथकाने या कॉल सेंटरवर छापेमारी करून दोघांना अटक केली आहे.
पुणे : मुंबईतील मुलुंड भागात बोगस कॉल सेंटर सुरू करून त्याद्वारे राज्यभरातील नागरिकांना कर्जाच्या आमिषाने लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दत्तवाडी पोलिसांच्या सायबर पथकाने या कॉल सेंटरवर छापेमारी करून दोघांना अटक केली आहे. तर, तब्बल ७ टीबी डाटा व ४० मोबाईल जप्त केले आहेत. दानेश रविंद्र ब्रिद (वय २५, रा. ठाणे) व रोहित संतोष पांडे (वय २४, रा. ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर, ४० व्यक्तींना नोटीस देण्यात आली असून, हे सर्व येथील कामगार आहेत. मुख्य आरोपी पसार होण्यात यशस्वी झाला आहे.
ही कारवाई परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा, सहाय्यक आयुक्त सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक विजय खोमणे तसेच उपनिरीक्षक अक्षय सरवदे, पोलीस अंमलदार काशिनाथ कोळेकर, जगदिश खेडकर, अनुप पंडित, सुर्या जाधव व प्रसाद पोतदार यांनी केली.
दत्तवाडी परिसरातील एका तरुणाला बजाज फिंसर्व्ह लाईफ इंन्शुरन्समधून बोलत असल्याचा फोन आला होता. संबंधिताने या तरुणाला अडीच लाखांचे कर्ज मिळवून देण्याची बतावणी केली होती. परंतु, त्यापोटी प्रिमियम म्हणून त्याच्याकडून पैसे उकळण्यात आले होते. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास केला जात होता. फोन मुलुंड भागातून आल्याची माहिती तांत्रिक तपासात समोर आली. त्यानूसार माहिती काढताना येथे बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून फसवणूक होत असल्याचे स्पष्ट झाले.
लागलीच पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा व वरिष्ठ निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय खोमणे, उपनिरीक्षक अक्षय सरवदे पथकाने येथे छापा टाकला. त्यावेळी कॉल सेंटरवर तब्बल ४० लोक काम करत असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर अनेकांना येथून बोगस कर्ज प्रकरणाद्वारे फसवणूक केली जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी मॅनेजर व त्याचा साथीदार अशा दोघांना ताब्यात घेतले. इतरांना नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. कॉल सेंटरमधून हार्ड डिस्क व इतर आवश्यक माहिती जप्त करण्यात आली आहे. त्याचा तपास सुरू आहे.
राज्यभरातील नागरिकांची फसवणूक…
मुलुंडच्या एका सोसायटीतून हे कॉल सेंटर चालविले जात होते. मुख्य आरोपी व कॉल सेंटरचा मालक पसार झाला आहे. या मालकाला स्थानिकांची बरीच रसद असल्याचेही याकारवाईदरम्यान दिसून आले. कॉल सेंटरमध्ये ४० मोबाईल केवळ संपर्क साधण्यासाठी होते. ते जप्त केले असून, अनेकांना यावरून कर्जाच्या आमिषाने संपर्क साधण्यात आला आहे. त्यामुळे ज्या नागरिकांची अशा प्रकारे फसवणूक झाली आहे, त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
कर्जाचे आमिष दाखविले…
बजाज फिंसर्व्ह लाईफ इंन्शुरन्समधून बोलत असल्याची बतावणी करत होते. त्यानंतर नागरिकांना कर्ज मिळवून देतो, असे सांगून त्यांच्याकडून कागदपत्रे घेत असत. त्यांना लोन मंजूर झाल्याचे सांगत व ते मिळविण्यासाठी प्रिमियम फी व इतर कारणे सांगून त्यांच्याकडून पैसे घेत असत. परंतु, पुन्हा त्यांना लोन देत नव्हते.