देशात नाव उंचवणारे “पुणे पोलीस” स्वत:च्या घरीच अपयशी

नवीन वर्षाच्या सुरूवातीला चतु:श्रृंगी परिसरात (११ जानेवारी) चार वर्षांच्या डुग्गूचे भरदुपारी अपहरण झाले होते. या प्रकरणात तब्बल ९ दिवस अख्ख पुणे पोलीस दल अपहरणनाट्याचा उलघडा करण्यासाठी जंगजंग पच्छाडत होते. पण, ना डुग्गू सापडत होता ना अपहरणकर्ता. शेवटी सोशल मिडीयावर गाजलेल्या अपहरणनाट्यात अपहरणकर्त्याने त्याला पुनावळे परिसरात सुखरूप सोडले. त्यामुळे पुणे पोलीस, पुणेकर व नेटकऱ्यांनी एकदाचा सुटकेचा श्वास सोडला.

  पुणे, देशात नाव उंचवणारे “पुणे पोलीस” स्वत:च्या घरीच अपयशी ठरले आहेत. आता हे अपयश कस दूर करायच हा प्रश्न पुणे पोलीसांना देखील सतावत असेलच. पण, त्यामुळे पुणे पोलीसांना स्वत:च्या घरात (पुण्यात) अपयश असे वाक्य ऐकावे लागत असून, शहरात भरदिवसा दोन मोठ्या घरफोड्या झाल्या असताना त्याचा थांगपत्ता अद्याप लागलेला नाही. कधी काळी नावजलेली गुन्हे शाखाही हतबल झाली असून, त्यांनाही या गुन्ह्यांचा छडा लागत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे अपयश पुणे पोलीसांचं असचं म्हणण्याची वेळ आली आहे. तत्पुर्वी एक अपहरणनाट्य पुणे पोलीसांसाठी अर्धवटच राहिल असून, तेही उघड होऊ शकलेले नाही. या घटना प्रातिनिधीक म्हणता येतील परंतु, घरफोड्या, लुटमार अन् स्ट्रीट क्राईमच्या अनेक गुन्ह्यांचा छडा लागलेला नाही.

  नवीन वर्षाच्या सुरूवातीला चतु:श्रृंगी परिसरात (११ जानेवारी) चार वर्षांच्या डुग्गूचे भरदुपारी अपहरण झाले होते. या प्रकरणात तब्बल ९ दिवस अख्ख पुणे पोलीस दल अपहरणनाट्याचा उलघडा करण्यासाठी जंगजंग पच्छाडत होते. पण, ना डुग्गू सापडत होता ना अपहरणकर्ता. शेवटी सोशल मिडीयावर गाजलेल्या अपहरणनाट्यात अपहरणकर्त्याने त्याला पुनावळे परिसरात सुखरूप सोडले. त्यामुळे पुणे पोलीस, पुणेकर व नेटकऱ्यांनी एकदाचा सुटकेचा श्वास सोडला. तस हे प्रकरणनंतर खुपच गाजले. शेकडो पोलीस कामकरूनही हाती काहीच लागत नव्हते. कारण, अपहरणकर्ता मिळाला तरच नाट्याचा शे‌वट होणार होता. पोलीसांनी हजारो दुचाकी, सीसीटीव्ही आणि मोबाईलचा डाटा तपासला. या परिसरात असणाऱ्या अनेक सीसीटीव्हीत देखील तो अपहरणकर्ता अर्धवट कैद झाला होता. परंतु, तरीही पोलीसांचे हात रिकामेच राहिले आहेत. आता या प्रकरणाला पाच महिन्यांचा कालावधी उद्या (११ जून) पुर्ण होत आहे. पण, अद्यापही पुणे पोलीस आणि पुणेकरांसाठी हे अपहरणनाट्य अर्धवटच राहिले आहे.

  वारजे माळवाडी परिसरात गणपती माथा येथे भरदिवसा सराफी दुकानाच्या भिंतीला मोठं भगदाड पाडून तब्बल अडीच किलो सोने चोरून नेल्याची घटना घडली. आता या घटनेला जवळपास अडीच महिन्यांचा कालावधी लोटला आहे. पण, यात देखील पुणे पोलीस अपयशीच असल्याचे म्हणावे लागेल. कारण, एकाला अटक केली. पण, मुख्य आरोपी अन यात गेलेला अडीच किलो सोने मिळालेले नाही. आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांचा ठावठिकाणाही मिळाल्याने पुणे पोलीसांच पथक तिथ जाऊनही येत आहे. पण, हाती काहीच लागत नसल्याचे वास्तव आहे.

  भगदाड पाडून चोरीची दुसरी घटना ही सायकलींची गस्त, सीसीटीव्ही सर्वाधिक असणारे पोलीस ठाणे व स्वत: पोलीस ठाण्यात कंट्रोल रूम असणाऱ्या समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेला सव्वा महिन्यांचा कालावधी पुर्ण होत आहे. ही चोरी इतकी हुशार पद्धतीने झाली होती की, चोरट्यांनी सोमवार पेठेतील मोबाईल शॉपीच्या दुकानामागील पडीक बैठ्या घरातून शॉपीच्या पाठिमागील भिंतीला भगदाड पाडले आणि चोरी केली. चोरट्यांनी तब्बल ५२ लाख ३० हजार रुपयांचे ३०७ मोबाईल चोरले. चोरट्यांनी मोबाईलचे कव्हर दुकानातच टाकून फक्त मोबाईल नेले आहेत. आता या गुन्ह्याचा देखील अद्यापही पोलीसांना थांगपत्ता लागलेला नाही. पोलीस मागावर आहेत अन् बरीच माहितीही या चोरट्यांची मिळाली असल्याचे सांगत असताना त्यांना पकडण्यात मात्र, अपयशी आहेत आणि हे वास्तव आहे. शहरात अशा अनेक घटना आहेत, ज्या उघड होऊ शकलेल्या नाहीत.

  गुन्हे शाखाही अपयशीच
  पुण्याची गुन्हे शाखा (क्राईम ब्रँच) कधी काळी खूपच नावारूपाला आली होती. कोणत्याही गुंड अन् गुन्ह्याचा छडा लावत असत. पण, सध्या गुन्हे शाखेत काही “राम” नाही, असे पोलीस दलात बोलले जात आहे. वरिष्ठ अधिकारी बैठका घेऊन फॉलोअप घेतात इतकच काय ते. पण, गुन्ह्यांचा छडा मात्र, लागत नसल्याचे वास्तव आहे. पुर्वी गुन्हा घडला की क्राईम ब्रँचला कळायचा अन् अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल होत असत. पण, आता घटना कळायलाच बराचसा वेळ लागत असल्याचे वास्तव आहे. त्यात गुन्हे शाखेचे लक्ष वेगळीकडेच असते. गुन्हे शाखेतच दोन गट असल्याचीही कुचबूज पोलीस दलात आहे. त्यामुळे सध्याची गुन्हे शाखा कशी असेल याचा अंदाज कळेल.

  घरफोड्या, वाहन चोऱ्या अन् लुटमार
  पुणेकर हैराण आहेत सध्या घरफोड्या, वाहन चोऱ्या अन लुटमारीच्या घटनांनी. वाढत्या घटना थांबवता येत नसल्याचे वास्तव आहे. पण, त्या उघडकीस येण्याचीही प्रमाण कमीच आहे.