पुणे पोलिसांची अमली पदार्थविरोधात मोठी कारवाई; ऊरळी कांचनमध्ये ३६ लाखांच्या एमडी अन् बंटा गोळ्या पकडल्या

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमली पदार्थांची मोठी कारवाई करत ऊरळी-कांचन परिसरात छापेमारी करून तब्बल ३६ लाखांचा साठा पकडला आहे. दिल्लीस्थित तरूणाकडून एमडी, बंटा गोळ्या आणि इतर असा ऐवज जप्ता केला आहे.

  पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमली पदार्थांची मोठी कारवाई करत ऊरळी-कांचन परिसरात छापेमारी करून तब्बल ३६ लाखांचा साठा पकडला आहे. दिल्लीस्थित तरूणाकडून एमडी, बंटा गोळ्या आणि इतर असा ऐवज जप्ता केला आहे. या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे.

  जितेंद्र सतीशकुमार दुवा (वय ४०, सध्या रा. ड्रीम्स निवारा सोसायटी, ऊरळी कांचन) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक शैलजा जानकर, पोलीस अंमलदार योगेश मोहिते, मारूती पारधी, सुजित वाडेकर, मनोजकुमार साळुंके, पांडुरंग पवार, ज्ञानेश्वर घोरपडे, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, संदिप शिर्के, राहुल जोशी, संदेश काकडे, नितेश जाधव, सचिन माळवे आणि महिला पोलीस अंमलदार रेहाना शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

  पुणे पोलिसांकडून अमली पदार्थांवर कारवाई करण्यासाठी कंबर कसली आहे. सोशल मिडीया, गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक तपास आणि इतर पद्धतीने पोलिसांकडून तस्करांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी पथकाला सूचना दिल्या होत्या. यादरम्यान, अंमली पदार्थ विरोधी पथक एकचे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार हे लोणी काळभोर परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी एकजन प्रयागधाम ट्रस्ट हॉस्पीटल शेजारी असलेल्या बस स्टॉप येथील सार्वजनिक रोडवर अंमली पदार्थांची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली.

  या माहितीची खातरजमा करत पोलिसांनी या भागात सापळा रचला. त्यानंतर संशयित आरोपी येताच छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एमडी आणि बंटा गोळ्या आढळून आल्या.

  पोलिसांनी अंमली पदार्थासह रोख रक्कम, ३ मोबाईल, वेरना कार असा एकुण ३६ लाख ४६ हजार २०० रूपयाचा ऐवज जप्त केला आहे. त्याने हे अमली पदार्थ कोठून आणले तसेच तो कोणाला विक्री करणार होता, याची माहिती पोलिसाकंडून घेतली जात आहे.