आता भटक्या कुत्र्यांपासून पुणेकरांना मिळणार मुक्ती; जाणून घ्या महापालिकेची योजना नेमकी काय?

महापालिका लवकरच पुणे शहरातील सगळ्या भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्याची मोहीम हाती घेणार आहे. यासाठी प्रत्येक कुत्र्यावर ४५० रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

    पुणे : पुणे शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, ती चावण्याच्या घटनाही सातत्याने वाढताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर रेबीजच्या संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. रेबीजला प्रतिबंध करण्यासाठी महापालिका लवकरच शहरातील सगळ्या भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्याची मोहीम हाती घेणार आहे. यासाठी प्रत्येक कुत्र्यावर ४५० रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

    केंद्र सरकारने व्यापक स्तरावर भटक्या कुत्र्यांची रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. देश २०३० पर्यंत रेबीजमुक्त करण्याचे उद्दिष्ट असून, त्यादृष्टीने उपाययोजना करण्यासही केंद्र सरकारने सांगितले आहे. यानुसार महापालिकेकडून भटक्या कुत्र्यांसाठी लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. महापालिका स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने ही मोहीम राबविणार आहे.

    मागील वर्षी शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या १ लाख ८० हजार होती. महापालिकेने नव्याने गावे समाविष्ट झाल्याने ही संख्या सुमारे अडीच लाख असेल, असा महापालिकेचा अंदाज आहे.

    महापालिलेकडून मागील वर्षभरात शहरातील ७ हजार ३११ भटक्या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली. यंदा जानेवारी महिन्यात ६० कुत्र्यांना ही लस देण्यात आली आहे. शहरातील एखाद्या विभागात कुत्रा चावण्याची घटना घडल्यानंतर महापालिकेकडून त्या भागात भटक्या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लस देण्यात येते. मात्र, कुत्र्यांची संख्या पाहता लसीकरणाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे आता सर्वच भटक्या कुत्र्यांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण केले जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

    शहरातील सर्व भटक्या कुत्र्यांचे एकाच वेळी लसीकरण शक्य नाही. त्यामुळे अनेक स्वयंसेवी संस्थांना या लसीकरण मोहिमेत सहभागी केले जाणार आहे. जेवढ्या जास्त स्वयंसेवी संस्था सहभागी होतील तेवढ्या प्रमाणात लसीकरण जास्त प्रमाणात होईल. पुढील आर्थिक वर्षात सुमारे ९० हजार भटक्या कुत्र्यांचे लसीकरण केले जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात ४ कोटी ५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे पशुवैद्यकीय अधीक्षक डॉ. सारिका फुंडे यांनी स्पष्ट केले आहे.