मध्यरात्री झालेल्या गोळीबाराने पुणे हादरलं; तरुण गंभीर जखमी

रविवारी सर्वत्र क्रिकेटचा जल्लोष सुरु असताना पुणे शहरात गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत एक जण गंभीर झाला. पुण्यातील बाणेर परिसरात घडलेल्या या घटनेमुळे सर्व परिसर हादरला आहे.

    पुणे : पुणे शहरात कोयता गँगचा अधुनमधून धुडघुस सुरु असतो. पुणे पोलिसांनी कोयता गँगच्या विरोधात धडक कारवाया केल्यानंतर गुन्हेगारांचे हल्ले सुरुच असतात. पुणे पोलिसांनी कोयता गँगचा म्होरक्यासह अनेक जणांना अटक केली. काही जणांवर मकोका लावण्यात आला आहे. तसेच काही जणांना हद्दपार करण्याची कारवाई झाली. आता रविवारी सर्वत्र क्रिकेटचा जल्लोष सुरु असताना पुणे शहरात गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत एक जण गंभीर झाला. पुण्यातील बाणेर परिसरात घडलेल्या या घटनेमुळे सर्व परिसर हादरला आहे.

    आकाश बाणेकर, असं गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर आदित्य रणावरे आणि सागर बनसोडे, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून शस्त्र जप्त केली आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जखमी आकाश याचा मित्र निलेश आणि आरोपींचा मित्र रोहित एकाच परिसरात राहतात. दोघेही एकाच मोटार कंपनीत कामाला होते. काही दिवसांपूर्वी कंपनीने रोहित याला कामावरून काढून टाकले होते. निलेश याच्यामुळे आपली नोकरी गेली, असा राग रोहितच्या मनात होता. रविवारी रात्री रोहितने निलेशला बाणेर परिसरातील महाबळेश्वर हॉटेल समोरील ४५ अव्हेन्युव बिल्डींगजवळ भेटायला बोलावलं. निलेश आणि त्याचा मित्र आकाश तिथे गेले असता, त्याठिकाणी रोहितचे मित्र आरोपी आदित्य रणावरे आणि सागर बनसोडे हजर होते.

    आरोपींनी निलेशला शिवीगाळ करत त्याच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात फिर्यादी यांचा मित्र आकाश बाणेकर याच्या उजव्या पायांच्या मांडीला लागून तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. निलेश याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अजूनही एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.