SPPU
SPPU

सार्वजनिक विद्यापीठांमध्ये अजूनही प्रथम क्रमांकावर

    पुणे : देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे स्थान कमालीचे घसरले आहे. विद्यापीठ सर्वच शैक्षणिक संस्थाच्या क्रमवारीत ३५ व्या स्थानावर तर विद्यापीठांच्या गटात १९ व्या क्रमांकावर फेकले गेले आहे. मागील वर्षी पुणे विद्यापीठ सर्वच संस्थांच्या गटात २५ व्या स्थानावर होते. २०२० मध्ये विद्यापीठ गटात नवव्या क्रमांकावर असलेल्या विद्यापीठाची ही घसरण चिंता वाढवणारी आहे, असे असले तरी महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठांमध्ये पुणे विद्यापीठ अजूनही प्रथम क्रमांकावर आहे.
    नॅशनल इस्टिट्यूशनल रॅंकिंग फ्रेमवर्कमध्ये (एनआयआरएफ) विद्यापीठांच्या क्रमवारीत पुणे विद्यापीठाला एकूण सरासरी ५८.३१ गुण मिळाले. तर ओव्हरऑल गटात ५५.७८ गुण आहेत. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंह यांनी सोमवारी सकाळी ही क्रमवारी जाहीर केली. देशातील शैक्षणिक संस्था, विद्यापीठांच्या वर्षभरातील कामगिरीच्या आधारे मंत्रालयाकडून हे रॅंकिंग दिले जाते.

    विद्यापीठांच्या मुल्यांकनामध्ये शोधनिबंध, पेटंट, शोधनिबंधांचा दर्जा आदींसाठी इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स अर्थात आयपीआर हा विशेष रकाना आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला यात १५ पैकी चक्क शून्य गुण मिळाले आहे. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांच्या संख्येच्या बाबतीतही विद्यापीठाला २० पैकी फक्त एक गुण मिळाला आहे. विद्यापीठाच्या घसरलेल्या रॅंकिंगमुळे एकंदरीत कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.