सौजन्य - नवराष्ट्र टीम
पिंपरी : केंद्र सरकारच्या ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाला (महिला आरक्षण विधेयक) काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीने संसदेत विरोध केल्यामुळे आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार पडसाद उमटले. महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा तीव्र शब्दांत निषेध करत महायुतीच्या सदस्यांनी ही सभा ५ मे २०२६ पर्यंत तहकूब केली. या आंदोलनामुळे स्वीकृत नगरसेवकांची बहुप्रतीक्षित नियुक्ती पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे.
सोमवारी (दि. २०) महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू होताच महायुतीचे नगरसेवक काळ्या फिती लावून सभागृहात उपस्थित झाले होते. महिला आरक्षण विधेयकावरून काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी सभागृहात घोषणाबाजी करण्यात आली. “हा प्रश्न केवळ एका पक्षाचा नसून देशातील समस्त महिलांच्या सन्मानाचा आहे,” अशी भूमिका मांडत सदस्यांनी सभा तहकूब करण्याची मागणी केली.
हे विधेयक अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आले आहे. काँग्रेसने ‘खाली डोके वर पाय’ अशी भूमिका घेऊन महिलांचा हक्क हिरावला आहे. – शर्मिला बाबर, उपमहापौर
प्रवेशद्वारावर महायुतीचे तीव्र आंदोलन
सभा तहकूब झाल्यानंतर आमदार उमा खापरे, महापौर रवी लांडगे, सभागृह नेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. यावेळी काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
“महिलांना सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने अधिकार मिळावेत, ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षणामुळे महिलांचे नेतृत्व सिद्ध झाले आहे. मात्र, संसदेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देणाऱ्या विधेयकात खोडा घालून काँग्रेसने नारीशक्तीचा अवमान केला आहे. या पापात सहभागी असणाऱ्यांना देश कधीही माफ करणार नाही.” – रवी लांडगे, महापौर
निषेध काँग्रेसचा, पण घोषणा मात्र स्व-सरकारविरोधी!
या आंदोलनातील सर्वात चर्चेचा आणि ‘कौतुकास्पद’ ठरलेला भाग म्हणजे सत्ताधारी नगरसेवकांचा झालेला गोंधळ. काँग्रेसचा निषेध करण्यासाठी जमा झालेल्या भाजपच्या काही नगरसेवकांनी उत्साहाच्या भरात आणि अनवधानाने चक्क ‘सरकारविरोधी’ घोषणा देण्यास सुरुवात केली. राज्यात आणि केंद्रात स्वतःचेच सरकार असताना स्वकीयांविरुद्धच घोषणाबाजी झाल्याने विरोधकांना आयते कोलीत मिळाले. पालिकेच्या वर्तुळात या ‘चुकीच्या’ घोषणाबाजीचीच जास्त चर्चा रंगली होती.
अनेक वर्षे रखडलेले आरक्षण मार्गी लागत असताना काँग्रेसने राजकारण केले. महिलांना सक्षम करण्याऐवजी अडथळे निर्माण करणाऱ्या काँग्रेसचा आम्ही निषेध करतो. – सुलभा उबाळे, नगरसेविका
राजकीय समीकरणे आणि नियुक्त्यांवर परिणाम
या गोंधळामुळे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. विशेष म्हणजे या आंदोलनात आमदार उमा खापरे, पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे आणि विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनीही उपस्थिती लावून एकजूट दाखवण्याचा प्रयत्न केला.
पुढील दिशा: ‘आक्रोश मोर्चा’
सभेच्या तहकुबीनंतर महापौरांनी मुंबईत होणाऱ्या ‘आक्रोश मोर्चा’त मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महिलांना केले आहे. एकीकडे आरक्षणाचा लढा आणि दुसरीकडे राजकीय श्रेयवाद, या कात्रीत सध्या पिंपरीचे राजकारण अडकल्याचे चित्र दिसत आहे.






