eyes flue photo

  पुणे: पुण्यासह राज्यभरात सध्या मोठ्या प्रमाणात डोळे येण्याची साथ आली आहे. हजारो रुग्ण या साथीने त्रस्त झाले आहेत. पुण्यातही खासगी आणि सरकारी रुग्णालयात डोळे येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. डोळे येणे हा आजार खूप गंभीर स्वरूपाचा समजला जात नाही; पण तो संसर्गजन्य असल्याने, डोळ्यांसारख्या नाजूक अवयवांवर त्याचा परिणाम होत आहे. तो बरा व्हायला बराच कालावधी लागत असल्याने तो होऊ नये याची काळजी घेणे योग्य आहे.

  लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येक वयोगटात हा आजार दिसून येतो. या आजाराचा संसर्ग हवेतून पसरत नसून तो स्पर्शातून पसरतो. डोळे येण्याची लक्षणे प्रथमतः एका डोळ्यात दिसतात आणि नंतर दोन्ही डोळ्यांना त्याचा त्रास होण्यास सुरुवात होते. हा संसर्ग हवेतून नाही तर स्पर्शातून पसरतो. यामध्ये डोळे लाल होतात, त्यामधून चिकट स्राव येतो. कदाचित यामुळे हलकासा तापही येऊ शकतो, अशी ही याची लक्षणे आहेत.

  हे इन्फेक्शन बॅक्टेरियल (जिवाणू), व्हायरल (विषाणू) किंवा ॲलर्जी यापैकी एका कारणामुळे होऊ शकते. परंतु सध्याचे इन्फेक्शन हे ॲडिनो व्हायरसमुळे होत असल्याचे ससूनमधील प्रयोगशाळेच्या तपासणीत समोर आलेले आहे. ही साथ संसर्गजन्य असल्याने रुग्णांना सर्व कामकाज सोडून घरामध्ये विभक्त व्हावे लागत असल्याने त्यांचे आर्थिक नुकसान देखील मोठ्या प्रमाणात होत आहे.

  -लक्षणे काय?
  – डोळे हलके लाल होऊ लागतात.
  – पाण्यासारखा चिखट द्रव्य येतो
  – डोळ्यांवर सूज येते
  – डोळ्यातून पाणी यायला लागते
  – खाज येऊ लागते
  – सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणेही जाणवू शकतात

  काय काळजी घ्यावी?
  – डोळे आलेल्या व्यक्तीने वापरलेला रुमाल, टॉवेल, साबण वापरणे टाळावे.
  – बाहेरून आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
  – डोळ्यांना सतत हात लावू नये.
  – डोळे स्वच्छ पाण्याने धुवावेत.

  -डोळे आल्यानंतर काय करावे?
  डोळे आल्यानंतर ते बरे होण्यासाठी साधारणपणे दोन आठवड्यांचा कालावधी लागताे. आजार बरा होण्यासाठी शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला पूरक औषधे डॉक्टर देतात. डोळ्यांत टाकण्यासाठी ड्राॅप देतात. तसेच ताप किंवा तत्सम काही लक्षणे असतील त्यावरही काही औषधे दिली जातात. ते वापरण्याबराेबरच कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर टाळावा. घरामध्ये टॉवेल, रुमालाचा वापर करावा. आजार संसर्गजन्य असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी जाणे पूर्णपणे टाळावे.

  -स्वच्छतेची विशेष काळजी घ्या
  राज्यात डाेळे येण्याच्या आजाराची तीव्रता खूप आहे. आजार गंभीर स्वरूपाचा गणला जात नसला तरी यामुळे डोळ्यांना इन्फेक्शन होण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे आजाराची लक्षणे जाणवू लागल्यास तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क करून औषधोपचार चालू करा. स्वतःच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्यायला हवी. – डॉ. रेश्मा सातपुते, नेत्रशल्यचिकित्सक

  रुग्णांनी सेल्फ मेडिकेशन करू नये. हे व्हायरल इन्फेक्शन आहे. मेडिकलवरून परस्पर औषध घेतल्यास आणि त्यांनी अँटिबायोटिक ड्रॉप दिल्यास हा संसर्ग बरा होण्याऐवजी तो वाढत जाऊन बुब्बुळावर डाग पडू शकताे किंवा दृष्टी अंधुक होऊ शकते. तसेच हा रुग्ण आणखी काही लोकांना संसर्ग देत असतो. काचबिंदू किंवा डोळ्याला मार लागल्यामुळे किंवा इतर कारणामुळे ते लाल होऊ शकतात. त्यामुळे नेत्ररोग तज्ज्ञांना दाखवूनच औषध घ्यावे. मेडिकलमध्ये जाऊन परस्पर औषधे घेऊ नयेत.

  - डॉ. सतीश शितोळे, सहयोगी प्राध्यापक, नेत्रविभाग, ससून रुग्णालय