‘ऑक्टोबर हिट’मुळे पुणेकर घामाघूम; गेल्या २ दिवसांपासून दिवसा अन् रात्रीही हवेत उष्णता

मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, देशातील काही भागातून तो परतला आहे. महाराष्ट्रातून देखील तो परतीच्या वाटेवर असून, पुणे शहरात ऑक्टोबर हिट पुणेकरांना जाणवत आहे. गेल्या दोन दिवसांपासून दिवसा व रात्रीही हवेत उष्णता जाणवत आहे.

    पुणे : मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, देशातील काही भागातून तो परतला आहे. महाराष्ट्रातून देखील तो परतीच्या वाटेवर असून, पुणे शहरात ऑक्टोबर हिट पुणेकरांना जाणवत आहे. गेल्या दोन दिवसांपासून दिवसा व रात्रीही हवेत उष्णता जाणवत आहे. त्यामुळे उकाड्याने आता पुणेकर हैराण होऊ लागले आहेत.

    देशातील उत्तरेच्या काही भागातून मॉन्सून पूर्णपणे परतला आहे. तो हळूहळू महाराष्ट्रातूनही जाईल. मुंबई आणि पुण्यातून ६ किंवा ७ ऑक्टोबर दरम्यान मॉन्सून परतीच्या वाटेवर जाईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला. त्यामुळे हवामान कोरडे राहणार असून, उकाडा जाणवणार आहे. दुपारचे तापमान ३० अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले जात आहे. त्यामुळे पुणेकरांना घाम फुटत आहे.

    शहरात सर्वाधिक तापमानाचा पारा मगरपट्टा येथे ३४.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. (दि.५) रोजी शहरातील आकाश दुपारी निरभ्र आणि सायंकाळी ढगाळ होते. आजपासून मात्र शहरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.