नाफेडच्या शेतकरी प्रोडुसर कंपन्यांद्वारा कांदा खरेदी; केंद्राकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी का फिरवली पाठ? 

कांद्याचे बाजार (Onion Market) कोसळल्यानंतर हवालदिल झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नाफेडने शेतकरी प्रोडुसर कंपन्यामार्फत खरेदी सुरु केली आहे.

नाशिक : कांद्याचे बाजार (Onion Market) कोसळल्यानंतर हवालदिल झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नाफेडने शेतकरी प्रोडुसर कंपन्यामार्फत खरेदी सुरु केली आहे. पहिल्या दिवशी 870 रुपये इतका तर दररोज वाढत 15 दिवसांत 1048 रुपये इतका बाजार भाव देण्यात येत असतानाही कागदपत्रांच्या अटी व शर्तींमुळे कांदा उत्पादक शेतकरी अल्प प्रतिसाद देत आहेत.

दुसरीकडे लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील 15 प्रमुख बाजार समितीमध्ये दररोज दोन ते सव्वा दोन लाख क्विंटल म्हणजेच 20 ते 25 हजार मेट्रिक टन कांद्याची विक्री होते. जर पंधरा दिवसांचा विचार केला तर अंदाजे 4 लाख मेट्रिक टनच्या जवळपास लाल व आणि नव्याने दाखल होत असलेला उन्हाळी कांदा शेतकऱ्यांनी बाजार समिती आवारात एक हजार ते 300 रुपयापर्यंत सरासरी 600 ते 700 रुपयांनी विक्री केला आहे. दुसरीकडे, नाफेडच्या शेतकरी प्रोडुसर कंपन्यांच्या केंद्रांवर पंधरा दिवसांमध्ये फक्त सात हजार मेट्रिक टन चांगला बाजार भाव असतानाही लाल कांद्याची विक्री झाली आहे.

अनेक शेतकऱ्यांनी सातबारा उताऱ्यावर लेट खरीप कांद्याची नोंद केल्यामुळे विक्रीसाठी अडचण येत आहे. त्यामुळे सरकारने नाफेडमार्फत घेत असलेल्या शेतकरी प्रोडूसर कंपन्यांना थेट बाजार समितीमध्ये उतरावे, अशी मागणी शेतकरी व नाफेडच्या शेतकरी प्रोडूसर कंपनीचे संचालक करत आहेत.