मामाकडे सुट्टीसाठी आलेल्या भाच्यावर काळाचा घाला ; नदीत बुडून मृत्यू धामणीखोऱ्यातील दुर्देवी घटना

मामाकडे सुट्टीसाठी आलेल्या तेरा वर्षीय भाच्याचा नदीत पोहण्यासाठी गेला असता पाण्यात बुडून मृत्यू झाला. धामणीखोऱ्यातील वेतवडे ता.पन्हाळा येथे ही घटना घडली असून गावासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.  पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खेरिवडे ता.गगनबावडा हे मुळ गाव पण सध्या राहणार पुणे येथील आदित्य शिवाजी पाटील (वय १३) हा मुलगा वेतवडे ता.पन्हाळा येथील आपल्या मामाकडे उन्हाळी सुट्टीनिमित्त महिनाभरापासून राहायला आला होता.

    गगनबावडा : मामाकडे सुट्टीसाठी आलेल्या तेरा वर्षीय भाच्याचा नदीत पोहण्यासाठी गेला असता पाण्यात बुडून मृत्यू झाला. धामणीखोऱ्यातील वेतवडे ता.पन्हाळा येथे ही घटना घडली असून गावासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.  पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खेरिवडे ता.गगनबावडा हे मुळ गाव पण सध्या राहणार पुणे येथील आदित्य शिवाजी पाटील (वय १३) हा मुलगा वेतवडे ता.पन्हाळा येथील आपल्या मामाकडे उन्हाळी सुट्टीनिमित्त महिनाभरापासून राहायला आला होता. शुक्रवार (दि.२६) रोजी दुपारी तीन ते चार वाजताच्या दरम्यान तो वेतवडे येथील धामणी नदीतील पाणवठ्यावर आंघोळीसाठी गेला होता.पण पोहता येत नसल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना चार वाजता घडली होती पण सायंकाळ होऊनही तो गावात न आल्याने सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. पाणवठ्यावर जनावरांना घेऊन गेलेल्या गावातीलच एका व्यक्तीला नदीकाठी चप्पल व कपडे काढलेले दिसल्याने मुलगा पाण्यातच असणार असा अंदाज लावून गावातील तरुणांनी एकत्र येत पाण्यात उतरून रात्री साडेसात वाजता मृतदेह शोधून काढला. त्यानंतर कळे पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर कोल्हापूर येथे पाठविण्यात आला. याबाबतची वर्दी युवराज लक्ष्मण पाटील (मामा)रा.वेतवडे ता.पन्हाळा यांनी कळे पोलीस ठाण्यात दिली असून पुढील तपास सपोनि प्रमोद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ शंकर पाटील करत आहेत.

     मामा-भाच्याच्या प्रेमाला तडा! नियतीने डाव साधला
    वेतवडे येथील युवराज पाटील यांचा आदित्य हा आवडता भाचा. अगदी कळत्या वयापासूनच आदित्यचे मामा युवराज यांच्यावर जीवापाड प्रेम होते. त्यामुळे दरवर्षी आदित्य सुट्टीनिमित्त मामाकडे येऊन रहायचा.मामाबरोबर पोहायला जाणे, फिरायला जाणे इत्यादी मुळे मामा-भाच्यात एक अनोखं नातं तयार झालं होतं. घटना घडली त्या दिवशी सकाळी मामा-भाचे नदीवर पोहायला जाऊन आले.पोहुन आल्यानंतर मामाने भाच्याला दिवसभरात खाऊसाठी काही पैसे दिले आणि, परत नदीवर जाऊ नको.  उद्या तुला गावी घालवायचे आहे, असे सांगून मामा कोल्हापूर येथे कामावर निघून गेला.युवराज यांच्या घरी फक्त आई असल्याने त्यांची नजर चुकवून आदित्य पुन्हा नदीवर पोहायला गेला आणि नियतीने डाव साधला.घटनास्थळी आई, वडील, मामाचा व इतर नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या मामा भाच्याच्या नात्याला अशा प्रकारे तडा गेल्याने गावासह संपूर्ण धामणीखोऱ्यातुन हळहळ व्यक्त होत आहे.