सागरी सुरक्षेसाठी मच्छीमारांना क्युआरकोड; दहशतवादी कारवाया टाळण्यासाठी उपाय

गेल्या काही वर्षांत असे प्रकार होण्याची शक्यता लक्षात घेऊन देशातील मच्छीमारी नौकांची नोंदणी, नौकांवरील खलाशांची नोंदणीला महत्त्व प्राप्त झाले आहे. युनिक आयडेंटी म्हणून आधार कार्डाकडे पाहिले जाते. त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीची ओळख असते.

    रत्नागिरी : मच्छीमारांना (Fisherman) समुद्रात मासेमारीला जाण्यासाठी क्युआर कोड पीव्हीसी आधारकार्ड (QR Code PVC Aadhar Card) अत्यावश्यक केले आहे. पुढील महिन्याच्या सुरुवातीपासून कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. खलाशी, मच्छीमारांचे आधारकार्ड क्युआर कोड तयार करण्यासाठी मत्स्य विभागाकडून (Fisheries Department) नोंदणी सुरू झाली आहे. आतापर्यंत १४ हजार ५७ मच्छीमारांची नोंद झाली आहे. सागरी सुरक्षेच्यादृष्टीने (Maritime Security) शासनाच्या आदेशानुसार हे पाऊल उचलले आहे.

    दहशतवादी (Terrorist) कारवायांसाठी कोकणातील (Konkan) समुद्र किनाऱ्याचा वापर झाल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सागरी सुरक्षेला महत्त्व प्राप्त झाले असून केंद्र शासनाकडून विविध उपाययोजनाही केल्या जात आहेत. दहशतवादी मच्छीमारी नौकांचा वापर करुन भारताच्या हद्दीत प्रवेश करतात. महाराष्ट्राला लाभलेल्या ७२० किमीच्या समुद्र किनाऱ्यावर हजारो मच्छीमार मासेमारीसाठी समुद्रात ये-जा करतात. यामध्ये अनेक मच्छीमारांकडे साधी ओळखपत्रेही नसतात. त्याचा गैरफायदा घेऊन दहशवादी शिरकाव करण्याची भीती व्यक्त केली जाते.

    काही दिवसांपूर्वी परदेशातील एक नौका भरकटत अलिबागच्या किनारी आली होती. त्यानंतर सुरक्षा यंत्रणाही तेवढीच सतर्क झाली होती. गेल्या काही वर्षांत असे प्रकार होण्याची शक्यता लक्षात घेऊन देशातील मच्छीमारी नौकांची नोंदणी, नौकांवरील खलाशांची नोंदणीला महत्त्व प्राप्त झाले आहे. युनिक आयडेंटी म्हणून आधार कार्डाकडे पाहिले जाते. त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीची ओळख असते. त्याला जोड म्हणून क्युआरकोड देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.