आर. आर. पाटलांच्या पत्नी आमदार सुमन पाटील आक्रमक; ‘या’ मागणीसाठी बसणार उपोषणाला

दिवंगत आर. आर. आबा पाटील (RR Patil) यांच्या पत्नी आमदार सुमन पाटील (Suman Patil) या सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला (Hunger Strike) बसणार आहेत. याबाबतचा इशारा त्यांनी दिला.

    सांगली : दिवंगत आर. आर. आबा पाटील (RR Patil) यांच्या पत्नी आमदार सुमन पाटील (Suman Patil) या सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला (Hunger Strike) बसणार आहेत. याबाबतचा इशारा त्यांनी दिला. तासगाव-कवठेमहांकाळ या त्यांच्या विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या टेंभू योजनेतून शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळत नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

    टेंभू व म्हैसाळ उपसा जल सिंचन योजनेतून सध्या आवर्तन सुरू असून, तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील भागाला पुरेसे पाणीमिळालेले दिसून येत नाही. सोमवारी आमदार सुमन पाटील स्वतः दिवसभर दोन्ही योजनेचे पाणी कोणत्या भागात किती पाणी आले हे पाहण्यासाठी दौरा केला. यावेळी कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे, तिसंगी, वाघोली, गर्जेवाडी, रायवाडी व तासगाव तालुक्यातील जरंडी, यमगरवाडी, दहिवडी या गावांना पुरेसे पाणी मिळत नाही, सध्या झालेल्या योजनेतून पुरेसे पाणी मिळेल असे, पाठबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र, ज्यावेळी सिंचन योजनेच्या बंदीस्थ पाईपमधून पाणी आले. त्यावेळी ते अतिशय कमी येत आहे, हे पाणी सिंचन योजनेसाठी पुरेसे नसल्याचे लक्षात आले.

    गेल्या काही दिवसांपासून घाटमाथ्यावरील शेतकरी आमदार सुमन पाटील यांच्याकडे याबाबत तक्रार करत होते. आमदार पाटील यांनी आज या भागात भेट देऊन पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी येत्या चार ते पाच दिवसात पूर्ण क्षमतेने पाणी न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी बांधवांना बरोबर घेऊन उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे.