रब्बी पिकांना अवकाळी पावसाचा फटका; भाजीपाला व फळबागांचे मोठे नुकसान, गहू व हरभरा पिके जमीनदोस्त

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तालुक्याच्या काही भागात धुमाकूळ घातल्याने रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिके जमीनदोस्त झाली. अनेकांच्या शेतातील भाजीपाला व फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे.

    मानोरा : वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तालुक्याच्या काही भागात धुमाकूळ घातल्याने रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिके जमीनदोस्त झाली. अनेकांच्या शेतातील भाजीपाला व फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावला गेल्याने बळीराजावर पुन्हा एकदा संकट कोसळले आहे.

    अतिवृष्टी, अवर्षन, दुष्काळ, गारपीट व अवकाळी पाऊस आदी संकटे जणू शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेली आहेत. खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानेतून बळीराजा कसाबसा सावरलेला असताना सोमवारी रात्री उशिरा आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

    तालुक्यातील कुपटा, जनुना, चोंढी, भोयनी, दापुरा, धानोरा भुसे, जामदारा, मोहगव्हाण, इंझोरी, जामदरा घोटी, तोरणाळा, म्हसनी, चौसाळा आदी भागांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातल्याने सोंगनीला आलेला गहू व हरभरा जमीनदोस्त झाल्याचे दिसून आले. काही शेतातील गहू, हरभरा पावसामुळे भिजला असून, भाजीपाला व फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.