‘मी पण नथुराम गोडसेच बोलतोय’ नाटकाच्या स्क्रिप्टवर आक्षेप; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

६१ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा १५ नोव्हेंबरपासून नगर केंद्रावर सुरू झाली. उल्हास नलावडे लिखित व दिग्दर्शित ‘मी पण नथुराम गोडसेच बोलतोय’ हे नाटक नगरच्या स्वराज्य युवा प्रतिष्ठानच्या वतीने पहिल्या दिवशी सादर झाले.

    अहमदनगर – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी नगर केंद्रावर मोठा राडा झाला. ‘मी पण नथुराम गोडसेच बोलतोय’ या नाटकाच्या स्क्रिप्टमध्ये महात्मा गांधी हत्या, नथुराम गोडसे यांना पश्चात्ताप व या घटनेशी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा संबंध जोडून ते यासाठी दोषी असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न झाल्याचा आक्षेप सावरकरप्रेमी व हिंदुत्ववादी संघटनांकडून घेण्यात आला.

    काही रंगकर्मी, प्रेक्षकांनीही नाराजी व्यक्त केली. त्यामुळे नाटकाच्या पहिल्याच दिवशी गोंधळ उडाला. पोलिस घटनास्थळी दाखल झाले, त्यामुळे तणाव निवळला. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत तोफखाना ठाण्यात कार्यकर्त्यांची गर्दी होती.

    ६१ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा १५ नोव्हेंबरपासून नगर केंद्रावर सुरू झाली. उल्हास नलावडे लिखित व दिग्दर्शित ‘मी पण नथुराम गोडसेच बोलतोय’ हे नाटक नगरच्या स्वराज्य युवा प्रतिष्ठानच्या वतीने पहिल्या दिवशी सादर झाले. या नाटकामध्ये चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडला जात असून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची चुकीची प्रतिमा समोर आणण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात आला.

    काही सावरकर प्रेमींनी सभागृहात उभे राहून, ‘हे नाटक बंद करा’अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर नगर शहरातील इतर हिंदुत्ववादी संघटनांना याची माहिती देण्यात आली त्यांच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ माऊली संकुल सभागृहात धाव घेतली. त्यामुळे गोंधळ उडाला. तणाव निर्माण झाल्यामुळे माहिती मिळताच तोफखाना पोलिस ठाण्याचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्ते ठाम राहिले. त्यांनी रात्री तोफखाना पोलिस ठाण्यात जाऊन तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

    या प्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार देणार असल्याचे उत्कर्ष गीते यांनी सांगितले. यातून चुकीचा इतिहास रसिकांसमोर मांडला जात आहे. त्यामुळे सावरकर प्रेमी व हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. पोलिसात तक्रार दाखल केल्यावर याबाबत सविस्तर म्हणणे मांडणार आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, नाटकाची स्क्रिप्ट सेन्सॉर होऊन आली असेल, तर अशा स्क्रिप्टला परवानगी दिली कशी, तेथील इतिहासकारांनी त्याची तपासणी करावी, असा आक्षेपही हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींनी घेतला.